बजरंग दलच्या कार्यकर्त्याची हत्या, कर्नाटकात कलम १४४ लागू

0

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटक पुन्हा एका नव्या वादात सापडले आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून हिजाब प्रकरणामुळे वातावरण तापले असतांना यात नवीन ठिणगी पडली आहे. कर्नाटकमध्ये रविवारी उशीरा रात्री बजरंग दलच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. शिवमोगा जिल्ह्यातील २६ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्यामुळे कर्नाटकात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, या बजरंग कार्यकर्त्याचे नाव हर्षा असे आहे. हे प्रकरण हिजाब वादाशी जोडून सुरुवातीचा तपास केला जात आहे. तपासादरम्यान समोर आले आहे की, हर्षाने अलीकडेचे आपल्या फेसबुक प्रोफाईलवर हिजाब विरोधात आणि भगव्या शोलला समर्थन करणारी पोस्ट टाकली होती. बजरंग दलच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर २३ फेब्रुवारीपर्यंत शिवमागो परिसरात १४४ कलम लागू करण्यात आला आहे.

या घटनेबाबत कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले की, ‘४-५ तरुणांच्या समुहाने एका २६ वर्षीय तरुणाची हत्या केली. या हत्येमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे मला माहित नाही. सध्या शिवमोगातील कायदा-सुव्यवस्थेने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून शहरातील सर्व शाळा आणि कॉलेज दोन दिवसांसाठी बंद केल्या गेल्या आहेत.’

दरम्यान हिजाब वाद कर्नाटकच्या उडप्पीतून सुरू होऊन संपूर्ण देशभरात पसरला आहे. सोशल मीडियापासून रस्त्यांपर्यंत, अनेक नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत या वादावर आपले मत व्यक्त करत आहे. तर दुसऱ्या बाजूला हिजाब वाद सुरू असतानाच बजरंग दल याप्रकरणात अधिक सक्रीय झाले आहे. सतत सोशल मीडियासह शिक्षण संस्थानांमध्ये हिजाब न घालण्याचे समर्थन करत आहे. अशातच हर्षाची पोस्ट आणि हे प्रकरण जोडले जात आहे.

कर्नाटकमध्ये हिजाब वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांनाच बजरंग दलच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावारण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.