‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : २७
मुद्दा १८ : सावित्री कर्तबगारी, इतर ठोस दृष्टांत :
राजा प्रजावत्सल असतो. तसा महात्मा प्रजावत्सल असतो. सावित्रीबाई महाप्राण होत्या वंचित चांडाळांसाठी, दारिद्र्याने पिडलेल्या गरीब दुबळ्यांसाठी. त्यांच्या काळजात उत्कट भाव होते. उत्कटता त्यांचा स्थायीभाव होता. म्हणून समाजवत्सल होत्या. नियतीचा खेळ वेगळा असतो. शूद्र कीटक असतो. सावित्री व ज्योतिबांना पुण्यातले धर्मशास्त्री, पंडित, त्यांच्या बायका व अनुयायी शूद्र कुणबी समजत. शूद्र कुणबी हे काय आपल्याला ज्ञान शिकविणार? विद्येचा मक्ता आम्हाला जन्मातूनच प्राप्त झाला असून शिकण्याचा आणि शिकविण्याचा आम्हाला अधिकार आहे. लिहिण्याचा अधिकार आम्हालाच आहे. आम्ही लिहू तोच इतिहास. अतः चुकीचा इतिहास त्यांनी लिहिला. त्यात महात्मा ज्योतिबा, महाप्राण समाजवत्सल क्रांतीची देवता सावित्रीकाकूंना व त्यांच्या कर्तबदारीला वगळून लिखाण केल्याने ज्यांचे कर्तृत्व समाजावर बिंबायला हवे, ते परिपूर्ण बिंबू दिले नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न तुम्हाला व आम्हाला अपुरेच पचलेले दिसतात. त्यांनी केलेल्या १८ कामांतून तेच विषय अधूनमधून आजही डोके वर काढतात. हा नाठाळपणा सर्वसामान्यांना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. शूद्रांचे शूद्रत्वाचे दुखणे, स्त्रियांची होणारी नाचक्की, निर्भत्सना, गरिबीचे चटके त्यांना पुढे आयते टाकून आळशी बनवत आहेत.
एक बाब लक्षात येते की, सावित्री नेवस्यांचे लग्न ज्योतिराव फुलेंशी झाले नसते तर, त्यांचे ठळक असे व्यक्तित्व अविर्भूत झाले असते काय? माझेच उत्तर आहे – ‘होय.’ कारण त्या पुणेरी होत्या”. त्यांना समाजनीती, स्त्रीनीतीबरोबर धर्मनितीचे अधिष्ठान लाभले होते. म्हणून त्या सडकून टीका (हे वास्तव असल्याने) प्रस्थापितावर करीत आल्या. ‘चंदनाची लगे पुसावळ परिमल वनस्पती मेळ करूनि.’ हे खरेच.
गंगेच्या काठी झोपडी करून कुक्कुट साधू महात्मा राहत होते. या महात्म्याचे दर्शन घेतले की, कुष्ठ जातो हे जगभर माहित होते. तीन खिया पीडित होत्या. त्या भेटीला चालू लागल्या. त्यांना समोरून महात्मा येताना दिसले. त्या जवळ येताना महात्म्याने कृपादृष्टी टाकली व ते म्हणाले, ‘समोर गंगा वाहते आहे. त्यात स्नान करा.’ स्नान आटोपून येताना त्या तीनही स्त्रिया खूपच सुंदर दिसू लागल्या. त्यांची पीडा गेली. ते महात्मा कुर्मदृष्टीने पाहून सर्व काम फत्ते झाले.
त्याचवेळी पुंडलिक नावाचा एक तरुण पत्नीसोबत घेऊन येत होता. पण चमत्कार असा की, तो हातात दोर धरून ओढण्याचेही काम करत होता. काय ओढत होता? एका वृद्ध स्त्री-पुरुषांचे पाय बांधून तो काशीयात्रेला आला होता. वृद्ध स्त्री-पुरुष त्याचे आई-वडील असावेत. त्यांना झाडाच्या पाल्यासारखे तो खरा खरा ओढीत होता. त्याच्या खांद्यावर लाडक्या बायकोला घेतलेले होते. महात्मा जवळ तो आला. थांबला. महात्मा जे समजायचे ते समजला. पायाचा स्पर्श तो यात्रिक तरुण घेत असता महात्म्याने आई-वडिलांच्या सेवेचा मंत्र दिला. त्यांची सेवा, दुखणे, त्यांना काय हवे? नको? ते देऊन कर्तव्यदक्षतेचा दुसरा मंत्र दिला. हे सोडून तीर्थयात्रा व्यर्थ असल्याचे सांगितले. चंद्रभागा तुझे स्वागत करेल. तुझ्या पायापर्यंत येईल ते केवळ आई-वडिलांच्या सेवेमुळे. पुंडलिकाचे गुरु कुक्कुट साधू झाले. हा उत्तम वैराग्य असलेला महात्मा तीन स्त्रियांना पिडेपासून मुक्त करून शुद्ध व सुंदर स्त्रिया बनवून काम फत्ते केले. आई-वडिलांच्या सेवेचे फळ म्हणून पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला श्री विठ्ठल अजूनही २८ युगापासून बसायला दिलेल्या विटेवर अजून उभा आहे.
त्याप्रमाणे तसेच सावित्रीकाकूबाई फुले यांनी स्त्रियांना क्रांतीच्या तप्त ज्वाळेत आणून शुद्ध सोन्यासारखे बनवले. स्त्री स्वातंत्र्य व स्त्री शिक्षण देऊन बाराव्या शतकापासून प्रस्थापितांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. कायमची त्यांची पारतंत्र्याची, निर्भत्सना, कुचंबणा यांच्या पिडेतून मुक्तता केली. कुक्कुट महाराजांनी दाखविलेल्या मार्गासारखा मार्ग स्त्रियांना दाखविला.
दुसऱ्या वरच्या दृष्टांतातून पुंडलिकामध्ये जो बुद्धिपालट केला, सेवेचा, पूजेचा, तीर्थाचा मार्ग दाखविला; तसाच शुद्रांच्यात शुद्धता आणण्यासाठी सोनेशुद्धीची बागेश्वरी सावित्रीबाईनी वापरली. शूद्र, चांडाळ वर्गाला देवमान्यता, जगमान्यता मिळवून दिली. हे मोठ्या क्रांतीसाठी येथे दिले आहेत.

वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७

