“बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेबसीरीजमध्ये दिसणारे पात्र बदनामीकारक !
IRS अधिकारी समीर वानखेडे यांची दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीची याचिका

नवी दिल्ली | लोकशाही न्यूज नेटवर्क
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान व गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलिज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
१८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेबसीरीजमध्ये वानखेडे यांच्यासारखे दिसणारे पात्र दाखवल्याने वाद उद्भवला आहे. ही मालिका खोटी व बदनामीकारक असल्याचा आरोप करत वानखेडेंनी सीरिजवर मनाई आदेश आणावा तसेच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
वानखेडेंच्या याचिकेत दोन कोटी रुपयांचा दावा करण्यात आला असून, ती रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी दान देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
याचिकेत म्हटले आहे की, रेड चिलिज निर्मित आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित मालिका अंमली पदार्थ विरोधी अंमलबजावणी विभागाचे विकृत चित्रण करते, ज्यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. शिवाय, आर्यन खानशी संबंधित प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असताना त्याविषयी बेजबाबदार चित्रण करण्यात आले आहे.


