Sunday, May 29, 2022

बालकांचा आहार आणि आरोग्याची विशेष काळजी कशी घ्यावी ?

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

सात्विक आणि पौष्टिक आहार ही सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली असते; असं म्हंटल तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. आपल्या रोजच्या आहारात डाळ, भात, विविध भाजा, कोशिंबिरी, दही, ताक, चपाती, उसळी यांचा नेहमीच समावेश असतो. काही प्रमाणात आपण मासे, चिकन किंवा मटणाचा देखील आहारात समावेश करतो. आपला हा आहार म्हणजेच पौष्टिक आहार मानला जातो. या आहारातून शरीराला आवश्यक असणारी प्रथिन, कर्बोदके, लोह, जस्त, कॅल्शियम असे सर्व घटक आपल्याला मिळतात. परंतु याच पार्श्वभूमीवर लहान मुलाच्या जन्मापासून ते मुलं वाढीस लागेपर्यंत त्याच्यावर जे आहाराचे विविध संस्कार आपण करत असतो, त्यातूनच त्या मुलाच्या शरीराची सुधृढ वाढ होत असते. मुळात बालकांचा आहार नेमका कसा असावा ? बालकांच्या आहाराची विशेष काळजी का घ्यावी ? आणि या आहाराचा बालकांच्या आरोग्याशी थेट कसा संबंध आहे ? याच सर्व प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ . नितीन पाटणकर यांच्याशी केलेली बातचीत.

- Advertisement -

१] सध्या जीवनशैली ही झपाट्याने बदलतेय याच पार्श्वभूमीवर बालकांच्या आहाराच्या सवयी देखील बदलत आहेत. परंतु बालकांचा आहार आणि त्यांचं आरोग्य ही प्रत्येक कुटुंबाची आवश्यक गरज आहे. हा परस्पर संबंध नेमका काय आहे ?

– यामध्ये कुटुंब हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक कुटुंबातील मूळ ही आपल्या आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या, काका काकी, मामा, मावशी अशा आपल्या नातेवाईकांच्या जीवनशैलीचेच अनुकरण करत असतात. आहाराच्या बाबतीत देखील हेच तत्व लागू होत. मुळात पालकांना मुलांच्या आहाराची उगीचच चिंता असते. परंतु कुटुंबात आपण जे काही रोज खातो तेच हि मुलं देखील खात असतात. आता तुम्ही कोणत्या प्रकारचा सात्विक आणि पौष्टिक आहार त्यांना देता यावर त्या मुलाचे सुधृढ आरोग्य अवलंबून असते.

२] मुलं जन्मल्यापासून सहा महिन्यांचे झाले कि त्याच्या जिभेवर आपण विविध प्रकारच्या चवीचे संस्कार करत असतो ते नेमके कसे ?

– मूल सहा महिन्याचं झालं कि आईच्या दुधा व्यतिरिक्त आपण त्यांना विविध प्रकारच्या पदार्थांच्या चवींची ओळख करून देत असतो. सुरवातीला त्याला गोड खायला देतो. मग खारट, तिखट, तुरट, आंबट आणि कडू अशा पदार्थांच्या विविध चवींचे संस्कार त्याच्यावर नकळत घडत असतात. सहाव्या महिन्यापासून मुलांना विविध भाज्यांचे सूप, फळांचा ज्यूस आणि डाळ तांदुळाचे खिमट किंवा पातळ खिचडी याची देखील चव मुलांना लागते आणि आपोआपच मुलाला पौष्टिक आहाराचे संस्कार घडवत असतो.

३] नवजात बालकाला आहार द्यायला नेमकी सुरवात कधी पासून करावी ?

– मुलं जन्मल्यापासून ते पहिल्या सहा महिन्यापर्यंत मुलाला फक्त आणि फक्त आईचे दूधच आवश्यक असते. हाच मुलाचा उत्तम आहार असतो. पुढे जेव्हा त्या मुलाची पचनशक्ती विकसित होत जाते तेंव्हा मग त्या मुलाला प्रथम शिजवलेले पदार्थ द्यावेत. विविध प्रकारची फळ आणि शक्यतो दाताने चावता येतील असे पदार्थ देखील त्याला हळूहळू द्यावेत म्हणजे त्याची पचनशक्ती सुयोग्य पद्धतीने विकसित होत जाते.

४] बालकांच्या बाबतीत अनेकदा आहाराची कमतरता जाणवते हि कमतरता भरून काढण्याचे उपाय काय ?

– १९२८ साली डॉ. देवीस नावाच्या एक बाईने एक प्रयोग केला होता. मुलांमधील आहाराची कमतरता मुलं स्वतःच भरून काढतात हे त्या बाईंनी सिद्ध करून दाखवलं होत. मुलांच्या समोर विविध प्रकारचे अन्नाचे प्रकार ठेवले तर मुलं आपल्याला आवश्यक ते आणि तेवढंच अन्न बरोबर निवडतात आणि खातात. निसर्गाने आपल्यला प्रत्येकाला जशी भूक दिलेली आहे तसेच काय खावे याचे ज्ञान देखील उपजतच असते. त्यासाठी मुलांच्या वाढीसाठी विशिष्ट किंवा वेगळा
आहार देण्याची गरज नसते.

५] मुलांना त्यांच्या वाढीनुसार आहार नेमका काय द्यावा ?

– मुलं नेमकं क्ती वर्षांचं आहे त्यावर त्याचा आहार अवलंबून असतो. आपल्या देशात अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही गेलात कि विविध प्रकारच्या पदार्थानी भरलेली थाळी असते. हि थाळी म्हणजे एक उत्तम पौष्टिक आहार असतो. या थाळीमध्ये मग विविध प्रकारच्या तृणधान्याचा, कडधान्यांचा, भाजा, सामिष (मांसाहार), फळांचा तेल आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो. शिवाय आपण पाणी देखील पितो. थोडक्यात हे एक प्रकारे पूर्णान्नच असत. आपल्या पूर्वजानी पौष्टिक आहार कसा असावा हे आपल्याला नकळतपणे शिकवलेले आहे. हाच आहार मुलांच्या आरोग्यासाठी सुयोग्य आहार आहे.

६] अनेकदा लहान मुलं रडले कि त्याला भूक लागली आहे असा अर्थ कढला जातो हा समज आहे कि गैरसमज ?

– हा गैरसमजच आहे. मुळात मुलांना दर ३ तासांनी काहीतरी खायला देणं आवश्यक असत कारण ती वाढत्या वयाची गरज असते. मुलाला खरोखरच भूक लागली ते खायला मागत. मात्र अनेकदा पोटामध्ये गॅस जमल्यामुळे किंवा इतर कारणामुळे मुलं रडत याचा अर्थ त्याला भूकच लागलेली आहे असा नाही. ज्या मुलांचे पालक दोघेही कामावर जातात त्या मुलांना शनिवार किंवा रविवारीच आपल्या मुलाला वेळ देता येतो. मग मुलाला प्रेमापोटी भरपूर प्रमाणात जंक फूड
खायला दिले जाते किंवा मोठ्या प्रमाणात हॉटेलिंग सुद्धा होते त्यामुळे मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

७] मुलांच्या आहाराच्या बाबतीत काही विशिष्ट आवडी निवडी असतात का ?

– मूल जसजस मोठं होत जात तसा त्याच्या चवीमध्ये बदल घडत जातो. त्यानुसार त्याच्या चवीवर नवनवीन प्रयोग केले जातात. काही काळ त्याला ठराविक पदार्थ आवडतो मग हि आवड बदलते. मुलांना नेहमी चौरस आहार द्यावा तेच तेच देणं हे चुकीचं आहे. भूक लागलेली असेल कि मुलं खातातच. परंतु टीव्ही वरील जंक फूडच्या किंवा फास्टफूडच्या जाहिराती बघून मुलांच्या खाण्याच्य सवयी बदलता जातात. यासाठीच प्रत्येक कुटुंबाने आठवड्यातून दोन दिवस तरी
संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवायला हवं त्यामुळे मुलांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक बदल हे सुयोग्य पद्धतीने घडतात.

८] मुलांनी योग्य प्रमाणात आहार घेतला नाही तर त्यांच्या शरीराची वाढ खुंटते का ?

– असं काहीही होत नाही. हल्ली बालरोगतज्ज्ञ आणि जवळपास सर्वच डॉकटरांकडे वजनकाटा असतो. मुलाची उंची आणि वजन जर योग्य प्रमाणात असेल तर भीती नाही. मात्र वजन घटने किंवा उंची वयाच्या मानाने कमी असेल तर त्यामुलाला विशिष्ट आजार असण्याची शक्यता असते. मात्र साधारणपणे सर्वसामान्य मुलांची वाढ हि नैसर्गिक पद्धतीने होते. त्यासाठी आहार वाढविण्याची अजिबात गरज नसते. प्रत्येक पालकाला गुटगुटीत ब्लॅक हवे असते. परंतु गंमत बघा जेंव्हा हे मुलं सडपातळ असते तेव्हा ते सुधृढ कसे होईल यासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु तेच मुलं वाढीस लागून जाड झालं कि पुन्हा त्याला सडपातळ करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु होतात. प्रत्येक मुलं हे त्याच्या शरीराच्या पचनशक्तीनुसार योग्य वेळी योग्य तो आहार घेतच असते.

९] हल्ली नर्सरीच्या मुलांना डब्यामध्ये फास्टफूड जंकफूड सर्रास दिले जाते. अनेकदा सर्व मुलांना एका दिवशी एक विशिष्ट पदार्थ आणायला सांगितले जाते हे योग्य आहे का ?

– खरं तर विविध शाळांमध्ये राबवला जाणारा हा उपक्रम एक उत्तम उपक्रम आहे. टिफीनमुळे मुलांच्या खाण्याच्या सवयी बदलतात आणि त्यांना नवीन चवीचे पदार्थ खाण्याची सवय लागते. मुलांना विशेषतः नर्सरीमध्ये शिकणाऱ्या मुलांना वेफर्स, पिझा, वडापाव असे पदार्थ डब्यावर दिले जातात. हे जंक फूड देणं चुकीचं आहे. परंतु जेंव्हा मुलं घरचा डबा आणतात तेंव्हा विशेषतः हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या मुलांना उत्तम आहारामध्ये बदल घडविणायची सवय आपोआप जडते. जसे कि एखादा मुलगा जर रोज डब्यावर काजू बदाम आणत असेल आणि दुसरा वडापाव तर एकमेकांना बदल म्हणून हि मूल पदार्थांचे एक्स्चेंज करतात आणि त्यामुळे त्यांना नवीन चवींचे ज्ञान होत जाते जे आरोग्याच्या दृष्टीने योग्यच आहे.

१०] साधारण ३ ते ४ वर्षाच्या मुलाला कोणत्या प्रकारचा पौष्टिक आहार द्यावा आणि कसा ?

– ३ ते ४ वर्षांचं मुलं म्हणजे वाढीस लागलेले मुलं असते. त्याची पचनशक्ती देखील विकसित होत असते. अशा मुलांच्या आहारात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असावा फळांचा समावेश देखील असावा. शिवाय कडधान्य, उसळी मोड आलेल्या, अंडी, मासे, चिकन, दुग्धजन्य पदार्थ अशा सकस आहाराचा अशा मुलांच्या आहारात समावेश केला कि त्याला प्रथिन, कर्बोदके, कॅल्शियम, लोह, जसंत असे सर्व घटक जे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात ते मिळतात.

११] डॉक्टर अनेकदा मुलांना सप्लिमेण्ट्री फूड सुचवतात खरोखरच याची गरज असते का ?

– सप्लिमेण्ट्री फूड म्हणजेच पावडरच्या स्वरूपात दिला जाणारा पोषक आहार. या पोषक आहाराच्या डब्यांवर जे लेबल असते त्यावर स्पष्ट दिलेले असते या मध्ये ६० ते ७० टक्के साखरेचा अंश असतो. परंतु हे सप्लिमेण्ट्री फूड मुलाला देण्यापेक्षा आपण घरी जी तांदुळाची खीर बनवतो ती देणं कधीही चांगलं. टीव्ही वरील जाहिराती पाहून मुलांना पोषक आहारासाठी अशा प्रकारच्या न्यूट्रीशिनल फूडची एक टूम आलेली आहे. परंतु आपले जे रोजच्या आहारातील घरगुती
पदार्थ असतात त्यामध्येच शरीरासाठी आवश्यक अनेक उत्तम घटक आपल्याला अगदी सहज मिळतात. आपण सकाळी नाश्त्याला जे दडपे पोहे खातो त्यातून मोठ्या प्रमाणात आयर्न मिळत. त्यामुळे रेडिमेड फूड देणं योग्य नाहीच.

१२] शालेय विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती तेज होण्यासाठी आणि मनाची एकाग्रता होण्यासाठी विशेष आहार कोणता द्यावा ?

– आपल्या मेंदूची कार्यशक्ती वाढविण्यासाठी आवशक्यता असते ती मेदाम्लांची आणि हि मेदाम्ल आपल्याकडे मिळणाऱ्या बांगडा या माशांमध्येच असत. त्यामुळे बांगड्यांचा आहारात समावेश करावा. शिवाय आक्रोड देखील खावे, ज्यामुळे मेदाम्ल वाढण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती नक्कीच तेज होते. आणि मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मर्यादित स्वरूपात असावे. सतत कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवतात.

१३] लहान मुलांच्या पोटात जंत किंवा कृमी होतात त्याच कारण काय ? आणि कृमी होऊ नयेत म्हणून त्यावर प्रतिबंधात्मक स्वरूपाचा उपाय काय ?

– अनेक लोकांचा गैरसमज आहे कि अति गोड खाल्यामुळे पोटात कृमी होतात. हे अत्यंत चुकीचं आहे. आपण आपली वैयक्तिक स्वछता ठेवली नाही तर अन्य मार्गाने देखील आपल्या शरीरात कृमी जाऊ शकतात. त्यामुळेच स्वछता हा यावर अत्यंत महत्वाचा उपाय आहे. आणि कुटुंबातील लहान मुलांसोबतच कृमीवर सर्वच कुटुंबाने एकत्र औषध घेणं देखील तितकेच महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या शरीरात असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया असतात त्यापैकी अनेक बॅक्टेरिया
शरीरासाठी घटक तर काही चांगले देखील असू शकतात. पोटात कृमी होऊ नये म्हणून आहारात दूध दही ताक आणि कांदा यांचा समावेश जरूर असावं.

संकलन –संयोजन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६
इमेल -subodh.ranshevre @rediffmail.com

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या