कष्टकऱ्यांच्या लढ्याचा आधारवड हरपला !
ज्येष्ठ समाजवादी व कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचे निधन
पुणे प्रतिनिधी असंघटित कामगार, हमाल, कष्टकरी आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झगडणारे ज्येष्ठ समाजवादी नेता डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गत बारा दिवसांपासून त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री ८.२५ वाजता प्रकृती बिघडून त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचा कणा
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील कामगार, शेतमजूर आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे आधारवड होते. असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या न्यायासाठी लढा उभारणाऱ्या ‘हमाल पंचायत’ या ऐतिहासिक संघटनेचे ते जनक. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो हमालांना हक्काचे मानधन, संरक्षण आणि सन्मान मिळाला.
सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते
‘एक गाव – एक पाणवठा’ या त्यांच्या चळवळीने जाती-अधारित भेदभावाविरोधात नवा लढा उभारला. सामाजिक समरसता, समानता आणि श्रमाचा सन्मान यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक संघर्ष केला. श्रमिक वंचितांच्या न्यायासाठी त्यांची भूमिका नेहमी ठाम आणि निर्भीड राहिली.
त्यांच्या पश्चात पत्नी शीला आढाव, पुत्र असीम व अंबर, तसेच सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक व कामगार चळवळीने एक मार्गदर्शक दीपस्तंभ गमावला आहे.