अखेर रामदेव बाबांचा माफीनामा; म्हणाले, माझ्या शब्दांचा…

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

योगगुरू बाबा रामदेव (Baba ramdev) यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलं होतं. त्यांच्या या विधानावरून चौफेर टीका झाली. आता अखेर बाबा रामदेव यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे.

राज्य महिला आयोगाकडे (State Commission for Women) लेखी स्वरूपात त्यांनी ही माफी मागितली असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत दिली आहे.

ठाण्यातील (Thane) एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात’, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. दरम्यान यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस (Amrita Fadnavis), शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) उपस्थित होते.

राज्यातील सामाजिक तसेच राजकीय महिला नेत्यांना बाबा रामदेव यांच्या विधानाचा निषेध केला होता. तसेच राज्य महिला आयोगाने देखील बाबा रामदेव यांना याबाबत नोटीस पाठवली होती. आपण महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा दोन दिवसांत खुलासा करावा, असं आयोगाने आपल्या नोटीशीत म्हटलं होतं. अखेर बाबा रामदेव यांनी महिलांची माफी मागितली आहे.

काय आहे माफीनाम्यात ?

‘भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या स्त्री सक्षमीकरणाच्या अनेक योजनांना मी नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. तसंच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी विविध सामाजिक संस्थांसोबत कामही करतो. त्यामुळे कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा कोणताही मानस नव्हता. ठाण्यात आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम महिला सशक्तीकरणावर आधारित होता. या कार्यक्रमातील काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे’.

‘मी आई आणि मातृशक्तीचा नेहमीच गौरव केला आहे. माझ्या एक तासाच्या लेक्चरमध्ये सुद्धा मातृशक्तीचाच गौरव करण्यात आला आहे. यामध्ये एक शब्द मी वस्त्रांसदर्भात बोललो आहे. याचा अर्थ माझ्यासारख्या साध्या वस्त्रांचा होता. मात्र तरीही माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी अत्यंत खेद व्यक्त करतो. मी त्या सर्वांची माफी मागू इच्छितो ज्यांचा माझ्यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत’.

 

Leave A Reply

Your email address will not be published.