जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहिम राबवावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या. त्याचबरोबर प्राणीप्रेमी नागरिकांनी कुत्रा व मांजरींचे पालकत्व घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हा प्राणी क्रूरता क्लेष प्रतिबंधक सोसायटीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे तसेच जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, शहर पातळीवर मनपा, नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणबाबतची विशेष मोहीम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करावी. गावपातळीवर ही मोहीम ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध निधीतून राबविण्यात यावी. कत्तलखान्यामधे कत्तलीकरिता येणाऱ्या जनावरांचे स्टिंग करुन कत्तल करावेत. नागरिकांनी मुक्या प्राण्यांवर प्रेम व दया भावना दाखवावी. वाहतुकीकरिता येणारे जाणारे जनावरांना मारहाण, चटके देणे, जखमा किंवा कुठल्याही प्रकारची छळवणूक होत असेल तर संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

बैलगाडीला टायरचे चाके लावल्यास बैलांना कष्ट कमी होतील. जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने बैलगाडी बनविणाऱ्या कारागीरांना अशाप्रकारचे मॉडेल तयार करुन द्यावे. असे ही त्यांनी सांगितले.

प्रसाद म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यात पेट शॉप तसेच डॉग ब्रिडर यांची अधिकृत नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. पशुकल्याणा बाबत जनजागृती करण्यात यावी. जिल्ह्यात मांजरी दत्तक घेणेबाबत आवाहन करुन पालकत्व स्विकारण्यास प्रोत्साहित करावे. जिल्हयातील २१ गोशाळेंचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे जिल्ह्यातील तालुकानिहाय उपलब्ध असलेला चारा आवश्यकता व उपलब्धता याबाबतचा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील सर्व गुरे व म्हैस बाजारात खरेदी विक्री करतांना शासन अधिकृत बारा अंकी बिल्ला (जनावरांचे आधार कार्ड) मारुनच खरेदी विक्री व्यवहार करावेत. अशा सूचनाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.