आयुर्वेद काळाची गरज

0

लोकारोग्य विशेष लेख 

सर्वेपि सुखें संतू ,सर्वेपि संतू निरामयाः

सर्वे भद्रानी पश्यन्तु ,मा कश्चित दुःख मापनीया 

अशा अर्थाचा संस्कृत श्लोक सर्वश्रुत आहे. याचा अर्थ असा की सर्वांचं जीवन हे सुखी असावं, वेदना रहित, निरामय असावं प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक मनुष्य जगत असतो. परंतु अनेकदा काहीतरी कारणामुळे आपल्याला एखादा आजार जडतो आणि त्यानंतर आजारातून बरे होण्यासाठी

मग आधुनिक प्रकारची ऍलोपॅथी असेल, नॅचरोपॅथी, होमियोपॅथी अशा उपचार पद्धतींचा आधार घेतो. आपण आजार झाल्यानंतर उपचाराकडे वळतो. परंतु आपल्याला विविध प्रकारचे आजार होऊच नयेत आणि शारीरिक आणि मानसिक आजारापासून अलिप्त राहायचे असेल तर त्यासाठीच आयुर्वेद उपचार पद्धती ही अत्यंत उपयुक्त उपचार पद्धती मानली गेली आहे.

किंबहुना मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाचे महत्व आणि योगदान हे मोलाचे मानले गेले आहे. आयुर्वेद उपचार पद्धती ही याच अनुषंगाने बदलत्या काळाची गरज बनलेली आहे. ती कशी ? हेच जाणून घेण्यासाठी पुण्याच्या जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. रुपाली बेदरकर जय यांच्याशी साधलेला संवाद..

१] स्वस्थ जगण्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद ही एक जीवन पद्धती मानली गेली आहे ती नेमकी कशी ?

– आयुर्वेद हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आयु म्हणजेच आपले आयुष्य, जीवन आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास करतो ते म्हणजे आयु आणि वेद म्हणजेच शास्त्र. जीवन जगण्याची कला किंवा शाश्त्र म्हणजेच आयुर्वेद. आपल्याकडे पूर्वापार चतुर्वेद संकल्पना आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या पैकी मोक्ष मृत्यूनंतर प्राप्त होतो. मात्र या त्रिसूत्रीनुसार शरीर निरोगी ठेवण्याची जी कला आहे किंवा शास्त्र आहे तेच आयुर्वेद. आयुर्वेदात दिनचर्या आणि ऋतूनुसार बदलणारी ऋतुचर्या याला फारच महत्व दिल गेलेलं आहे. दिनचर्या म्हणजे आपण झोपतो, आपला आहार, मनस्थिती आपण जन्मल्यापासून अगदी बाल्यावस्था ते वृध्दावस्थेपर्यंत आपली दिनचर्या सुरळीत ठेवणे याला अत्यंत महत्व आहे.  त्यातूनच आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आणि ऋतुमानसनुसार बदलणारी जीवनशैली लक्षात घेता आपल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थांना जपणे, निरोगी ठेवणे आणि त्यासाठीच आयुर्वेदाचे महत्व हे अबाधित स्वरूपाचे आहे.

२] आयुर्वेदाचे अवतरण म्हणजे नेमकं काय ?

– आयुर्वेदाचे अवतरण हे अगदी प्राचीन काळापासून म्हणजे अगदी ऋषीमुनी पासून ते मानवाकडे आलेले आहे. पुढे त्यातूनच ग्रंथांची निर्मिती केली गेली आणि हे आयुर्वेदाचे प्राचीन भांडार हस्तलिखितांच्या स्वरूपात जपले गेले. आपल्याकडे अगदी चरक ऋषींची चरक संहिता, सुश्रुत ऋषींची शुश्रुत संहिता आणि वाग्भटांची संहिता हे आयुर्वेदावर आधारित तीन महत्वपूर्ण ग्रंथ मानले जातात. त्यानंतर माधव निदान, शारंगधर संहिता अशा लघु ग्रंथांचा देखील समावेश होतो. आयुर्वेदाच्या शाखा या अष्टांग स्वरूपात उपलब्ध आहेत ज्या प्रमाणे मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये सर्जरी, पीडियाट्रिक, इ अँड टी, ऑर्थोपिडिक, गॅस्ट्रोलॉजी अशा विविध शाखा आहेत.  त्याप्रमाणेच अगदी हजारो वर्षांपूर्वी अगदी आयुर्वेदात देखील काय, बाळ, गृह,ऊर्ध्वान्ग अशा अष्टांग शाखा दिसतात. यामध्ये सर्व प्रकारच्या आजारांचा आणि उपचारांचा समावेश दिसतो. आपले पूर्वज इतके द्रष्टे होते याची ही कमालच आहे.

३] आयुर्वेद हा आजच्या बदलत्या काळातील बदलते आजार लक्षात घेता काळाची गरज आहे ती नेमकी कशी ?

– हो आयुर्वेद ही आजच्या काळाची नक्कीच गरज आहे. आजच्या काळातील आजारांची आपण निज आणि आगन्तु म्हणजेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दोन प्रकारात विभागणी करू शकतो. यापैकी संसर्गजन्य आजारांमध्ये श्वासाचे अगदी मागील दोन वर्षांपासून सुरु असलेला कोरोना सारखा आजार हा याच प्रकारातील आजार आहे. स्पर्शाने होणारे आजार हे संसर्गजन्य आजार आहेत. यामध्ये अशा प्रकारच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मानवी प्रतिकारशक्ती सशक्त असणे अत्यंत महत्वाचे असते. कारण एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाचा संसर्ग होतो आणि बाकीचे दोघे या आजारापासून मुक्त असतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती ही  अत्यंत स्ट्रॉग असते. ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच आयुर्वेदातील दिनचर्या अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी आयुर्वेदातील अगदी छोट्या औषधांचा देखील उपयोग होतो. असंर्गजन्य आजारांमध्ये उच्चरक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित विविध आजरांचा समावेश होतो. याकडे आयुर्वेदाने चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे हे आजार आहेत असे सांगितले आहे. परंतु अशा प्रकारच्या व्याधीवर आयुर्वेदात अनेक प्रकारच्या वनौषधी गुणकारी ठरणाऱ्या दिसतात. आजार झालाच तरी कमीत कमी औषध घेऊन हे आजार बरे होऊ शकतात. म्हणूनच आजच्या काळात आयुर्वेदिक उपचार ही काळाची  गरजच आहे.

४] आधुनिक प्रकारची अलोपॅथिक उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती यामध्ये फरक काय आहे ?

– आपण कोणताही आजार झाला की वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करतो. जसे की होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, ऍलोपॅथी परंतु या सर्व पॅथी आहेत. आयुर्वेद पॅथी नाही तर या उपचार पद्धतीमध्ये चिकित्सेला अत्यंत महत्व दिल गेले आहे. आयुर्वेदामध्ये जी व्यक्ती निरोगी आहे, स्वस्थ आहे अशा व्यक्तीच्या शरीराचे आणि मनाच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला महत्व आहे. आजार झालंच तर त्यावर उपचार करण हे त्यानंतर येते. आपल्याकडे सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद यामध्ये देखील निरोगी जीवनशैली जगण्यासाठीचे उपाय सांगितले गेले आहेत. याच अनुषंगाने आपल्या दिनचर्येचा आणि ऋतुचर्येला अत्यंत महत्व दिल गेलं आहे. ऍलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये प्रत्यक्ष आजार झाल्यानंतर करावयाचे उपचार दिसतात. हा या दोहोंमधला फरक आहे.

५] आयुर्वेद म्हणजे कडू काढे, कडू आणि तुरट बेचव असलेल्या गोळ्या आणि औषध अगदी दीर्घकाळ रुग्णाला घेणं भाग असतं असा एक गैरसमज जनमानसात आहे तो खरा आहे का ?

– अनेक रुग्ण अगदी दीर्घकाळ एखाद्या मोठ्या आजारासाठी अशा प्रकारे कडू किंवा तुरट चवीची औषध घेत असेल तर त्याचा असा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. त्याच्या अनुभवातून त्याला तसे वाटते. त्यात अनेक उपचारानंतर जर तो रुग्ण आयुर्वेदाकडे वळून अशा प्रकारची औषध घेत असेल तर त्याला ती औषध कडवट आणि बेचव वाटतात. परंतु आयुर्वेदात रसात्मक आहाराचे महत्व सांगितले आहे. आपल्या आहारात गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू अशा प्रकारचे सर्व अन्न असायला हवे. परंतु आपल्याला नेमके तुरट आणि कडू अन्न आवडत नाही जे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. कारण अशा चवीमुळेच आपल्या शरीराचे स्वास्थ उत्तम राहू शकते. आपल्या शरीरातील वाढलेले पित्त आणि रक्तातील दोष दूर करण्यासाठी कडू आणि तुरट पदार्थ महत्वाचे असतात. म्हणून असे पदार्थ खायला हवेत. आयुर्वेद म्हणजे कडू औषध हा एक गैरसमज आहे. चवनप्राश असेल किंवा काही प्रकारची चूर्ण आणि गोळ्या या मधासोबत खाव्या लागतात त्या गोडच असतात की..  गंमत म्हणजे आयुर्वेदिक औषध ही गोळ्या, चूर्ण, सिरप अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपण घेऊ शकतो.

६] आताचा काळ हा कोरोना सारख्या महामारीचा आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात संपूर्ण जगच चिंताग्रस्त आहे. परंतु हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदात अशा प्रकारच्या आजाराचा काही उल्लेख आढळलेला आहे का ?

– चरक संहितेत जनपदोध्वंस व्याधीचा उल्लेख आढळतो. म्हणजे जनपदाचा विध्वंस करणारे आजार. म्हणजेच महामारीचे आजार जो सध्या कोरोना आहे. चरक संहितेप्रमाणे वायू, जल जेव्हा दूषित होतात तेव्हा त्या देशात अशा प्रकारे महामारीची व्याधी उद्भवते. अनेक प्रकारच्या रसायनांमुळे पाण्याचे आणि वेगवेगळ्या विषारी वायूमुळे हवेचे प्रदूषण प्रचंड वाढलेले आहे त्याचाच दुष्परिणाम हा महामारीची साथ उदभवण्यामागे दिसतो. महामारी ही औपसर्गिक आहे. म्हणजेच एकमेकांच्या शरीर स्पर्शाने किंवा श्वासामुळे, सहवासामुळे, सोबत एकत्र जेवल्यामुळे असे आजार हे सहज पसरतात जे औपसर्गिक असतात.

७] कोरोना प्रमाणेच अनेक विषाणूजन्य स्वरूपाच्या आजारांचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो का ?

– आयुर्वेदात अशा प्रकारच्या विषाणूजन्य व्याधींना अनुक्त व्याधी असं चरक संहितेत संबोधलं गेलं आहे. काळानुसार ह्या व्याधी बदलत जाणार आहेत. मात्र त्याची नाव वेगवेगळी असतील. मात्र आयुर्वेदात सांगितलेली चिकित्सा प्रणाली मात्र काळ कितीही बदलला तरी तीच राहणार आहे. आणि प्रत्येक काळात ही चिकित्सा उपयुक्त ठरणारच आहे. एखादा रुग्ण जेव्हा उपचारासाठी येतो तेव्हा त्याच्या शरीरातील वात, पित्त, कफ हे दोष त्याबरोबरच त्याच्या शरीरातील सात धातू त्या व्यक्तीचा अग्नी, बळ, मानसिक स्थिती या सर्वांची चिकित्सा करूनच मग आयुर्वेदिक उपचार केले जातात. आयुर्वेदातील चिकीत्सा सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा मानला जातो.

८]आयुष् या उपचार पद्धती बद्दल हल्ली खूप चर्चा आहे यामध्ये आयुषचा अर्थ नेमका काय आहे ?

– यामध्ये ए म्हणजे आयुर्वेद, वाय म्हणजे योग निसर्गोपचार, यु म्हणजे युनानी, एस म्हणजे सिद्ध, आणि एच म्हणजे होमिओपॅथी. आयुर्वेदात चिकीत्सा पद्धतीला खूपच महत्व दिले गेलं आहे. लोकांचा आयुष्य आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर खूप विश्वास आहे, कारण मुळात या उपचार पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.  हि उपचार पद्धती स्वस्त देखील आहे आणि सुयोग्य मार्गदर्शनाखाली जर हे उपचार केले तर ते यशस्वी ठरतातच.

९] कोविडच्या काळात आयुर्वेदाचे उपचार अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत म्हणून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून काय प्रयत्न केले गेले ?

– कोविडची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा आयुष्य मंत्रालयाने आयुष नियमावली, मार्गदर्शिका प्रसिद्ध केली होती. यामध्ये अगदी सोप्या उपाय योजना होत्या. कोविडची लोकांच्या मनात भीती होती त्यातच लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर पडता येणं देखील अशक्य होत हेच लक्षात घेऊन अगदी घरच्या घरी योग्, प्राणायम असे सोपे व्यायाम कसे करावेत हे सुचवलेले होते. याकाळात शारीरिक हालचाली कमी झालेल्या होत्याच शिवाय मानसिक ताण देखील जास्त होता यावर प्राणायाम सारखा व्यायाम हा उत्तम उपाय सुचवलेला होता. गरम पाणी पिण्यास सुचविलेले होते. ज्यामुळे आपण खाल्लेलं अन्न सहज पचवता येणं शक्य होत. आणि आपलं कफ देखील कमी झाल्याने सर्दी आपॊआपच कमी होते. आजारी पडल्यानंतर आपल्या शरीरातील अग्नी कमी होतो त्यामुळेच गरम पाणी पिल्याने अग्नी पुन्हा प्रज्वलित होऊन भूक वाढण्यास मदत होते. याशिवाय हळदीचं दूध जो आपला पारंपरिक उपाय देखील सुचविला गेला होता. तुळशीची पान, लवंग, दालचिनी, मिरी याचा काढा पिणं हे उपाय होते. आणि याखेरिक नास्य चिकित्सा म्हणजे नाकातून गाईचे तूप, तिळाचे तेल घेणे ज्यामुळे विषाणूपासून आपले संरक्षण होऊ शकते. ऑइल पुडिंग तसेच आयुष्य संग्रहींनी अँप देखील आयुष् मंत्रालयाने सुरु केले. आयुष्य काढा, अनुषं तेल याचे किट, आयुसंवाद हा जनसामान्यांशी आयुर्वेदाची महती सांगणारा जनजागृनपर कार्यक्रम असे समाजोपयोगी बरेच उपक्रम आयुष्य मंत्रालयाने यशश्वीपणे राबविले.

१०] कोविडच्या काळात शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासंदर्भात खूपच चर्चा झाली शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितलेले आहेत ?

– शरीराची प्रतिकारशक्ती ही काही एक दिवसात कुठली औषध घेऊन लगेच वाढविता येत नाही. आयुर्वेदामध्ये याकरिता आपला आहार, विहार आणि आचार अशी रसायनसूत्री सुचवलेली आहे. आपला रोजचा आहार हा सात्विक असावा. जेवण हे षडरसात्मक असावे म्हणजे ज्यामध्ये सहा चवींचा समावेश होईल असे जेवण असावे. आहार हलका आणि प्रमाणात असावा आणि मुख्य म्हणजे दुपार आणि संध्याकाळ अशा दोन वेळेला तो प्रमाणत घ्यावा. तहान लागली तरच पाणी प्यावं. विहार रस म्हणजे आपली शारीरिक हालचाल त्यासाठी रोज नियमित योग्य, प्राणायाम करावा, भरपूर चालण्याचा व्यायाम करावा. आणि आचार रस म्हणजे तुमचं मन हे दुसऱ्याबद्दल नेमकं कस आहे ? हे महत्वाचं आहे.  इतरांबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. एकूणच आहार, विहार आणि आचार रस ही  रसायनसूत्री आयुर्वेदाने सुचवलेली आहे जी प्रतीकरशक्ती वाढविते. अर्थात सर्वात शेवटचं उपाय म्हणजे औषधी. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक औषधी वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत ..

संकलन –संयोजन

सुबोध रणशेवरे

संपर्क -९८३३१४६३५६

इमेल –http://subodh.ranshevre @rediffmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.