
मन की बात
भारतीय जनता पक्ष सध्या देशातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली राजकीय पक्ष मानला जातो. त्याचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. पण या विस्तारासोबतच एक गंभीर समस्या समोर येत आहे, ‘आयाराम’ संस्कृतीची वाढ. इतर पक्षांमधून येणाऱ्या नेत्यांचा ओघ इतका वाढला आहे की, त्यामुळे पक्षातील मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीचे आणि असंतोषाचे स्वर ऐकू येऊ लागले आहेत. ‘आयाराम-गयाराम’ ही संज्ञा भारतीय राजकारणात अशा नेत्यांसाठी वापरली जाते जे वारंवार पक्षांतर करतात. निवडणूक जवळ आली की अनेक राजकीय नेते सत्ता आणि संधीच्या शोधात पक्षांतर करताना दिसतात. भाजपात अशा आयारामांची संख्या वाढते आहे आणि याचे परिणाम अंतर्गत व्यवस्थापनावर आणि गटबाजीवर होताना दिसत आहेत.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम येवू घातला असून काँग्रेस, राष्ट्रवादी (शप), शिवसेना (उबाठा) पक्षातून भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय गणित बिघडत असतांनाही भाजपाचे वरिष्ठ मात्र ‘आयारामां’साठी पायघड्या टाकत आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षात जे फाटाफूटीचे राजकारण झाले तेच भाजपामध्येही होवू शकते हा धोका वेळीच ओळखणे गरजेचे झाले आहे. निष्ठावंतांना डावलून भाजपा ‘आयारामां’ना संधी देत असतील तर ते धोक्याचे ठरु शकते. मध्यंतरी जळगाव, धुळे जिल्ह्यातील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतले असले तरी ते स्वहितासाठी आहे हे न समजण्याइतपत जनता खुळी नाही.
‘आयाराम’ ही भाजपासाठी स्थिती एका अर्थाने संधी आहे. इतर पक्षांतून येणाऱ्या मोठ्या नेत्यांमुळे पक्षाचा प्रभाव आणि जनाधार वाढतो. काही ठिकाणी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते फायदेशीरही ठरते. परंतु, दीर्घकाळापासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नजरेत ही एक प्रकारची गद्दारी वाटू शकते. जे लोक पक्षाच्या संस्कृतीतून वाढले, त्यांनी अनेकदा तिकीट न मिळाल्याने किंवा नवीन आलेल्यांना संधी दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. नवीन येणाऱ्यांना तातडीने महत्त्वाची पदे किंवा उमेदवारी दिली गेल्यास जुने कार्यकर्ते नाराज होतात. यामुळे गटबाजी, अंतर्गत मतभेद, स्थानिक पातळीवर असंतोष आणि संघटनात्मक कमकुवतपणा हे धोके वाढू शकतात. काही ठिकाणी तर निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोरीकडे वळताना दिसले आहेत.
भाजपासारख्या मोठ्या पक्षाला याचे व्यवस्थापन अतिशय समतोलपणे करणे आवश्यक आहे. आयाराम येतीलच, हे वास्तव आहे. पण त्यांचे स्वागत करताना पक्षाने मूल्य, निष्ठा आणि कार्यकर्त्यांची निगा यांचा विसर पडू नये. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे, तिकीट वाटपात पारदर्शकता ठेवणे, पक्षांतर्गत प्रशिक्षण आणि प्राधान्यक्रम स्पष्ट करणे, आणि जुन्यांना न्याय देणे हे आवश्यक ठरेल. ‘आयाराम’ संस्कृती हे केवळ भाजपाचे नव्हे, तर अनेक पक्षांचे वास्तव बनले आहे. मात्र, भाजपाच्या बाबतीत ही गोष्ट विशेष ठरते कारण त्यांचा पक्षसंघटन आणि विचारधारेचा ठसा अधिक ठळक आहे. त्यामुळे आयारामांमुळे जर निष्ठावंतांवर अन्याय होणार असेल, तर ती पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. वेळेत सावध होऊन योग्य धोरण आखणे हाच या समस्येचा तोडगा आहे.

दीपक कुलकर्णी
वरिष्ठ उपसंपादक
मो. 9960210311

