चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि थोर समाजसुधारक संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीचे औचित्य साधून आज चाळीसगाव येथे प्रचंड उत्साह आणि भक्तीमय वातावरणात भव्य महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या बंजारा संस्कृती दर्शन गीत-नृत्य स्पर्धेत राजदेहरे सेटलमेंट येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेने सर्वांची मने जिंकत द्वितीय क्रमांक पटकावला.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा आणि संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित या स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यातील १२ तांड्यांमधील एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध हालचाली आणि बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणामुळे संपूर्ण मैदान मंत्रमुग्ध झाले होते.
१०० गुणांच्या कडक निकषांवर आधारित असलेल्या या स्पर्धेचे परीक्षण केंद्रप्रमुख दिलीप सावंत, मंजुषा मराठे आणि दुर्गा गोफणे यांनी केले. यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजदेहरे सेटलमेंट येथील १७ विद्यार्थ्यांच्या संघाने उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करत द्वितीय क्रमांक आपल्या नावे केला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांना रोख १५,००० रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे, माजी समाज कल्याण सभापती राजेंद्र राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, सामाजिक कार्यकर्ते दिनकर राठोड, नमोताई राठोड आणि स्पर्धाप्रमुख विजय राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या घवघवीत यशाबद्दल राजदेहरे सेटलमेंट शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

