अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पाचोरा तालुक्यातील घटना

गर्भवती झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात; डॉक्टर अटकेत
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक प्रकरण समोर आले असून, मुंबईत पोलिस दलात कार्यरत असलेल्या मावस काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप उघड झाला आहे. या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गोळ्या देऊन गर्भपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी आरोपी मावस काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गर्भपात करणारे डॉक्टर रवींद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जून २०२५ मध्ये घडली. अल्पवयीन पीडिता ही पाचोरा तालुक्यातील गावातील आजी-आजोबांसोबत राहते. याच काळात मुंबईतील पोलिस दलात कार्यरत असलेल्या मावस काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघड करू नये म्हणून ‘तुझे पोलिस होण्याचे स्वप्न मी उद्ध्वस्त करीन’ अशी धमकीही तिला दिली होती.
ऑक्टोबर महिन्यात पीडितेला उलट्या आणि तब्येतीची तक्रार सुरू झाल्यानंतर तिने आजीला माहिती दिली. आजीने त्वरित तिची पाचोरा येथे सोनोग्राफी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर पीडितेच्या आईच्या संमतीने स्थानिक डॉक्टरांनी गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.
दरम्यान, पीडित मुलीनेच धैर्य दाखवत जळगाव महिला दक्षता समितीला व्हॉट्सअॅपद्वारे मदतीचा संदेश पाठवला. समितीने प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पाचोरा पोलिसांना तातडीने माहिती दिली. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी पीडितेला पाचोरा पोलीस ठाण्यात बोलावून तिची रितसर तक्रार नोंदवण्यात आली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गर्भपात करणारे डॉक्टर रवींद्र पाटील यांना अटक केली असून मावस काकाविरुद्ध बलात्कार, धमकी आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

