बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला पाच वर्षांची शिक्षा

अमळनेर न्यायालयाचा निकाल

0

बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला पाच वर्षांची शिक्षा

अमळनेर न्यायालयाचा निकाल

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर न्यायालयाने रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात पीडिता आणि फिर्यादी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

लोटन पंडित पाटील (वय ६१, रा. कृष्णापुर, ता. चोपडा) याने दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी गल्लीतील एका बालिकेवर अत्याचार केला. ती रस्त्याच्या बाजूला शौचास बसली असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर चोपडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १०, १२ तसेच अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आरोपीला अटक करून कारागृहात पाठवले.

सरकारी अभियोक्ता ॲड. आर. बी. चौधरी यांनी खटल्यादरम्यान ९ साक्षीदारांची तपासणी केली. या साक्षांमध्ये पीडिता आणि फिर्यादी यांच्या जबानींना महत्त्व देण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वर्ग १ सौ. सी. व्ही. पाटील यांनी आरोपीस पोक्सो कायद्यात दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा देण्यात येईल, असा निर्णय देण्यात आला. इतर कलमांमध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या खटल्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर, सहायक फौजदार उदयसिंग साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्ड, प्रमोद पाटील, भरत ईशी, सतीश भोई आदी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला वेगाने न्यायालयासमोर उभे करता आले आणि न्याय मिळवता आला.

Leave A Reply

Your email address will not be published.