भद्रावती, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील बसस्टॉप परिसर तसेच भद्रावती नगर परिषद भवनाजवळ हेलियमच्या मोठ्या जनजागृती बलूनची उभारणी करण्यात आली आहे. स्वच्छ निळ्या आकाशात झेपावणारा हा संदेशवाहक बलून नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
नगर परिषदेच्या उपक्रमांतर्गत लावलेल्या या बलूनवर निवडणूक माहिती, मतदान दिनांक आणि जनजागृतीशी संबंधित संदेश आवर्जून छापले असून, हे संदेश लांबूनही स्पष्ट दिसतात. नागरिकांमध्ये मतदानाबाबत उत्सुकता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या नवकल्पनेमुळे शहराचे सौंदर्यही अधिक खुलून दिसत असून, अनेक नागरिकांनी बलूनचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “सरकारी जाहिरातींपेक्षा अशा कल्पक माध्यमांचा उपयोग अधिक दृष्टीवेधक ठरतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. नगर परिषदेमार्फत पुढील काही दिवस हे बलून शहरातील विविध ठिकाणी लावण्याचा विचारही व्यक्त करण्यात आला आहे.

