लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा मोठा डाव फसला आहे. पोलिसांना वेळीच सुगावा लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पळून जावे लागले असून, एटीएममधील ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड पूर्णपणे सुरक्षित राहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या (३.४५) सुमारास पाचोरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील जारगाव येथील सारोळा रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. तीन ते पाच अज्ञात तरुण गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचे कॅबिनेट तोडत होते. त्यांनी पैशांनी भरलेले मुख्य कॅबिनेट तोडून ते जवळच उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारमध्ये (क्र. एमएच-४९-सीएस-७०२८) ठेवण्याची तयारी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार हरीशकुमार अहिरे आणि पोलीस शिपाई बजुसिंग बंजारा यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच चोरट्यांची तारांबळ उडाली. चोरट्यांनी पैशांचे कॅबिनेट तेथेच टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
प्राप्त माहितीनुसार, बजुसिंग बंजारा यांनी एका संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने खिशातून पिस्तूल काढून धमकावले. त्यानंतर चार ते पाचही चोरटे क्रेटा कारमध्ये बसून सारोळा रोडमार्गे तारखेडा दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. हरीशकुमार अहिरे आणि बजुसिंग बंजारा यांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग सुरू केला.
दरम्यान, चोरटे तारखेडा रोडकडे जात असताना पोलिसांनीही त्यांचा कसून पाठलाग केला. गाळण गावाजवळ इतर पोलिस कर्मचारी व स्थानिकांच्या मदतीने पाठलाग अधिक तीव्र करण्यात आला. मात्र चोरटे नगरदेवळा, कजगाव, तामसवाडी मार्गे पारोळा रोडवरून थेट शिरूड चौफुलीच्या दिशेने निघून गेले. पोलिसांच्या पाच वाहनांनी चित्रपटातील ‘धूम’ शैलीतील थरारक पाठलाग केला, तरीही चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले.
चोरटे धुळे किंवा मध्य प्रदेशच्या दिशेने पळून गेल्याची शक्यता लक्षात घेऊन टोल नाके तसेच धुळे आणि मध्य प्रदेश कंट्रोल रूमला तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे बँक लुटली जाण्यापासून वाचली असली, तरी बँकेच्या तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. इतकी मोठी घटना घडूनही एसबीआय एटीएमचे तंत्रज्ञ आणि कर्मचारी सकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते.
पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीशकुमार अहिरे आणि पोलीस शिपाई बजुसिंग बंजारा हे घटनास्थळी अवघे दोन मिनिटे उशिरा पोहोचले असते, तर कदाचित चोरटे त्यांच्या मनसुब्यात यशस्वी झाले असते. त्यांच्या सतर्कता, धाडस आणि प्रसंगावधानामुळे सुमारे ९ लाख रुपयांची रोकड वाचविणे शक्य झाले आहे. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.


