पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कडेवडगाव येथे दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालून तिच्या अंगावर दारू ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिना राजू तडवी (वय 34, रा. कडेवडगाव, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राजू किशोर तडवी (वय 38) हा फिर्यादीचा पती असून दि. 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वादाच्या वेळी आरोपीने दारूच्या नशेत पत्नीला, तू तुझ्या वडिलांकडे जास्त राहतेस, तुझे तिथेच संबंध आहेत, असा संशय व्यक्त करत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर घरात ठेवलेल्या बाटलीतील दारू पत्नीच्या अंगावर ओतली. आज तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत आरोपीने माचीस पेटवून तिच्या अंगावर फेकल्याने तिच्या उजव्या हाताला, मानेजवळ, छातीवर व पोटावर गंभीर भाजल्या गेल्या. घटनेनंतर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 356/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


