विवाहितेची आत्महत्या की हत्या? माहेरच्यांचा सासरच्यांवर गंभीर आरोप
जळगाव ;– तालुक्यातील धानवड येथे सोनी चेतन चव्हाण (वय २२) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र, तिच्या माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून तिला ठार मारण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सोनी चव्हाण या आपल्या पती आणि दोन मुलांसह धानवड येथे राहत होत्या. १७ मार्च रोजी रात्री १० वाजता घरात कुणी नसताना तिने गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मयत सोनी चव्हाणच्या आई-वडिलांनी तिच्या पती चेतन चव्हाण आणि सासरच्या मंडळींवर खूनाचा आरोप केला आहे. चेतनला दारूचे व्यसन होते आणि तो वारंवार सोनीला मारहाण करत असल्याचे त्यांनी सांगितले. तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही आत्महत्या नसून तिला गळफास लावून मारण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मयत विवाहितेच्या पश्चात दोन लहान मुले, आई-वडील आणि भावंडे असा परिवार आहे.