खेडी शिवारात परप्रांतीय ट्रक क्लिनरची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव – गुवाहाटीहून झाडू वाहून आणलेल्या ट्रकच्या क्लिनरने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी खेडी शिवारात उघडकीस आली.पतिराज सिंह छत्रपाल सिंह (वय २७, रा. सिंगरौली, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एमआयडीसीतील एका कंपनीत गुवाहाटीवरून आलेला झाडू भरलेला ट्रक खाली करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी चालक अंघोळीला गेला, तर क्लिनर पतिराज सिंह ट्रकमध्ये विश्रांती घेत होता. काही वेळानंतर तो ट्रकमधून उतरून बाहेर गेला. मात्र, तो परतला नाही.
खेडी शिवारातील एका शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक इसम दिसला. त्याच वेळी मयताच्या मोबाईलवर फोन येत होता. शेतकऱ्याने फोन उचलला आणि क्लिनरच्या आत्महत्येची माहिती मिळाली.
एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


