लोकशाही संपादकीय लेख
रविवारी संपूर्ण देशाने आपला 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात साजरा केला. प्रजेला मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतिबिंब या संपूर्ण सोहळ्यात अनुभवण्यास मिळाले. दिल्लीच्या प्रमुख सोहळ्याचे आकर्षण साऱ्या देशाला असते. येथे होणाऱ्या विविध कसरती, सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या देशाचा संस्कृती ‘याची देही याचची डोळ्या’ पाहण्यास मिळते. यावर्षी पूर्णपणे भारतीय बनावटीची शस्त्रे, रणगाडे, विमाने, हेलिकॉप्टर यांचे प्रदर्शन भारतीयांना झाले आहे. ‘स्वदेशी अपनाओ देश बचावो’ हाच नारा या प्रजासत्ताक दिनी खऱ्या अर्थाने सत्यात उतरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत आपल्याला घडवायचा असून त्याची झलक या सोहळ्यातून होणे हे आपल्यासाठी भाग्याचे संकेत आहेत.
देश युद्ध सामग्रीने परिपूर्ण झाला तर कुणाचीही हिंमत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची होणार नाही. आजमितीला आपण याच सामग्री तयार करण्यावर भर देत असून त्याच आपल्या देशाला मोठे यश प्राप्त होत असून खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर होत आहे, याचा आनंदच नाही तर अभिमान देखील आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. लोकांनी निवडून दिलेल्या लोकनियंत्रणाखाली असलेली शासनव्यवस्था; यामुळेच भारत हा स्वयंशासित देश आहे. दि. 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही व्यवस्थेसह राज्यघटना अस्तित्वात आली आणि आपण लोकशाहीचा स्वीकार केला. राष्ट्राचा आत्मा असलेल्या संविधानाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून ब्रिटिश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाला. भारतीयांना स्वतंत्र विचाराचे, स्वातंत्र्याचे अधिकार सापडले.
देशासाठी, या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. लोकशाही मूल्यांना बळकटी देणारा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय उत्सव भारतात सर्वत्र आनंदाने, उत्साहाने, अभिमानाने साजरा केला गेला. रविवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर मोठ्या थाटात उत्सव साजरा झाला. लष्कराच्या तिन्ही दलांचे संचलन आणि भारताच्या संरक्षणाच्या शस्त्रांचे प्रदर्शन पाहताना ऊर भरून आला. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, राष्ट्रगीत, 21 तोफांची सलामी, अमरज्योती स्मारकाजवळ शहिदांना श्रद्धांजली, लष्करी संचालनाकडून राष्ट्रपतींना मानवंदना, ऐतिहासिक लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांचे देशाला उद्देशून भाषण, विविध राज्यांचे आपली पारंपरिक, सांस्कृतिक वारसा जपणारे कलाविष्कार, निवडलेल्या विषयांची चित्ररथावरची विरासत पाहताना आपण एकरूप होवून आपल्या देशाच्या विविधतेत एकता पाहून खऱ्या अर्थाने धन्य देखील झाला आहोत.
राज्यातील प्रमुख वास्तू, सरकारी कार्यालय, सोसायटी, रस्त्याचा दोन्ही बाजू विद्युत रोषणाईने झगमगत होता. शालेय मुलांच्या प्रभात फेरीतील घोषणा, फलक लक्ष वेधून घेत. शाळा, महाविद्यालयात होणाऱ्या स्पर्धांमुळे लोकांचा सहभाग वाढतो. अशा कार्यक्रमांतून नागरिक प्रजासत्ताक दिनाशी जोडले जात आहेत हे एक शुभसंकेत देखील मिळाले आहेत. असा हा लोकशाहीचा सार्वभौम सोहळा ‘मी भारतीय आहे’ याची जाग देतो. अनेक भाषा, प्रांतीय रितिरिवाज वेगळे असूनही एकता आहे हे भारताचे वैशिट्य! यावर्षी प्रजासत्ताक दिनाची थीम, ‘स्वर्णिम भारत : विरासत आणि विकास’, ‘स्वर्णीम भारत: सुवर्ण भारत’, ‘अखंड भारत स्वर्णीम भारत’ अशी होती. आपल्या बुद्धीच्या जोरावर भारताने जगाला मोठा वारसा दिला आहे. हेच भारताचे ‘सुवर्णयुग’ म्हणावे लागेल.
21 व्या शतकात समाज, समाजातील प्रश्न पूर्णपणे बदलत आहेत. माध्यमांची क्षमता वाढलीय, डिजिटल युगामुळे सारे व्यवहार पारदर्शक झाले. वेळ वाचतो, दगदग कमी झाली. आज भारत विज्ञान, आरोग्य, आयटी, अंतरिक्ष यात खूप प्रगत आहे. अंतरिक्ष क्षेत्र आणि संरक्षण खात्यांत स्वबळावर संशोधन आणि निर्मिती आणि निर्यातही करत आहे. दळणवळणाचे रस्ते, फ्लायओव्हर, ट्रेन, हवाई विमाने या साऱ्या वाहतुकीच्या साधनात अनेक पटीने सुधारणा होत असल्याने सारी राज्ये जोडली गेली आहेत. भारतीय वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळत आहे. तरीही आजही समाजात काही प्रश्न निश्चित आहेत. अवकाशातील भरारी, समानता, वैज्ञनिक दृष्टिकोन, नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारताचा सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करायचा आहे. ‘समर्थ भारत, आत्मनिर्भर भारत’च्या प्रवासात प्रत्येक भारतीयांचा हातभार लागल्यास खऱ्या अर्थाने आपण स्वर्णीम भारतीय होणार आहेत यात शंका नाही!