गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; आगीत नोटा जळून खाक
एमआयडीसी टोलनाक्याजवळ पहाटे थरार; आंतरराज्यीय टोळीचा संशय
जळगाव (प्रतिनिधी): एमआयडीसी परिसरातील टोलनाक्याजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न करताना अचानक आग लागल्याने एटीएममधील नोटांनी पेट घेतल्याची घटना शनिवारी पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास घडली. या आगीत लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची शक्यता असून, नेमकी किती रोकड जळाली किंवा लांबविण्यात आली याची पडताळणी सुरू आहे.
जळगाव–अजिंठा रस्त्यावरील एमआयडीसी टोलनाक्याजवळील एटीएमवर चारचाकी कारमधून आलेल्या चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशिन कापण्यास सुरुवात केली. मशिनचा मोठा भाग कापण्यात आल्यानंतर अचानक एटीएममधील नोटांना आग लागली. आग भडकताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
आंतरराज्यीय टोळीचा संशय
राज्यात यापूर्वीही अशा पद्धतीने एटीएम फोडीच्या घटना घडल्याने ही कारवाई आंतरराज्यीय टोळीने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांचा शोध सुरू आहे.
रोकड पडताळणीनंतर तक्रार
सदर एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम खासगी कंपनीकडे देण्यात आले असून, काही दिवसांपूर्वी सुमारे ११ लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर ग्राहकांनी किती रक्कम काढली आणि घटनेच्या वेळी किती रोकड शिल्लक होती, याची पडताळणी झाल्यानंतरच जळालेल्या व संभाव्य लांबविलेल्या रकमेचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. त्यानंतर अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे.
रिक्षाचालकामुळे माहिती मिळाली
एटीएममध्ये आग लागल्याचे प्रथम एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आले. त्याने शेजारच्या दुकानाच्या पाटीवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून दुकानदाराला माहिती दिली. दुकानदाराने तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.