एटीएमजवळ हातचालाखी; सेल्समनची १३ हजारांची रोकड लंपास

0

एटीएमजवळ हातचालाखी; सेल्समनची १३ हजारांची रोकड लंपास

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेजवळ भरदिवसा दोन भामट्यांनी हातचालाखी करत एका सेल्समनची १३ हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घडली. या प्रकरणी पंधरा दिवसांनंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीत राहणारे सतीश दशरथ चौधरी (वय ५७, व्यवसाय – सेल्समन) हे एसबीआयच्या मुख्य शाखेत एटीएममधून पैसे काढून बाहेर पडत असताना दोन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले. ‘पैसे मोजून देतो’ असे सांगत त्यांनी चौधरी यांचा विश्वास संपादन केला. काही क्षणांतच हातचलाखी करत त्यांनी चौधरी यांच्याकडील १३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली व ते दोघे पसार झाले.

थोड्याच वेळात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सतीश चौधरी यांनी शनिवारी (दि. १३) दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोळे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. एटीएम परिसरात अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.