बापरे..! ईडीच्या पथकावर प्राणघातक हल्ला
सायबर क्राइम प्रकरणी आरोपीच्या निवासस्थानी गेले होते तपासाला
लोकशाही न्यूज नेटवर्क
सायबर क्राइम प्रकरणातील आरोपीच्या निवासस्थानी तपासाला गेलेल्या ईडीच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ईडीचं पथक सायबर क्राइमशी संबंधित एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपींच्या ठिकाणांवर छापा टाकायला गेलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ईडीचे पथक PPPYL सायबर एप फ्रॉड प्रकरणातील आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या भावाच्या ठिकाणांवर छापा टाकण्यासाठी गेलं होतं. यावेळी आरोपींनी अचानक ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. हल्ल्यात काही अधिकाऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार केले जात आहेत. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
घटनेनंतर स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी एफआयआर दाखल केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. यासोबतच ईडीच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आलीय.
पोलिसांनी सांगितले की, हल्ल्यावेळी आरोपींनी खुर्ची डोक्यात मारली. घटनास्थळावर तुटलेली खुर्ची आढळून आलीय. पोलीस आता हल्लेखोरांचा शोध घेत असून त्यांच्या तपासासाठी पथके रवाना केली आहेत.