ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी (असरानी) यांचे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फुफ्फुसात द्रव साचल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने २० ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार अत्यंत साध्या पद्धतीने सांताक्रुझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पत्नी मंजुला असरानी यांनी सांगितले की, “असरानी यांनी त्यांच्या निधनाचा गाजावाजा करू नका, मृत्यूला समारंभ बनवू नका,” अशी इच्छा व्यक्त केली होती. म्हणूनच कुटुंबाने अंत्यसंस्कारानंतरच त्यांच्या निधनाची माहिती दिली.
चित्रपटसृष्टीत पंचाहत्तरहून अधिक वर्षांचा कारकीर्द असलेल्या असरानी यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘आंदोलन’ अशा असंख्य चित्रपटांमधून विनोदी तसेच गंभीर भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.
भारतीय चित्रपटसृष्टीतल्या हास्यविनोदाला नवा चेहरा देणारा हा बहुमुखी कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.