लोकशाही न्यूज नेटवर्क
नारायणगाव :हेलिकॉप्टरनेच करा अष्टविनायक दर्शन या पहिल्या अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन हवाई प्रवासाला शुभेच्छा देत या सेवेचा गणेश भक्त व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यानिमित्ताने कवडे यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत विघ्नहराचा अभिषेक व महाआरती होवून मान्यवर प्रवासी भाविक यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. अल्पोपहार घेवून मान्यवरांना हेलीपॅडकडे रवाना करण्यात आले. या शुभारंभप्रसंगी हेलिकॉप्टरचे पूजन अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे, किशोर कवडे, गणपत कवडे, मंगेश मांडे, कैलास मांडे, विजय घेगडे, राजश्री कवडे, माजी अध्यक्ष मुरलीधर घेगडे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, बबन मांडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेली अष्टविनायक दर्शनाची हवाई सफरीची प्रतीक्षा आज संपली. श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि सर्व अष्टविनायक देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या संकल्पनेतून बुधवारी (दि. ३०) हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शनाचा प्रारंभ झाला.
या हेलिकॉप्टरद्वारे दर्शनाचा पहिला मान श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बी. व्ही. मांडे, माजी अध्यक्ष वसंतराव पोखरकर, उद्योजक मीराताई पोखरकर, सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवीताई राऊत यांना मिळाला.
महाराष्ट्र शासनाने जुन्नर पर्यटन तालुका घोषित केल्यापासून जुन्नर तालुक्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातून जगभरातून गणेशभक्तांना एकदातरी अष्टविनायक गणपतीचे दर्शन व्हावे, अशी मनोकामना असते. प्रवासाची सर्व साधने उपलब्ध असून देखील वेळेअभावी अष्टविनायक दर्शनाचा लाभ काही भाविक घेऊ शकत नाही.
ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन ट्रस्टने भाविकांसाठी व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी कमीत कमी वेळेमध्ये अष्टविनायक दर्शन (परिक्रमा) पूर्ण होण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे दर्शन हा संकल्प प्रथम श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने सर्व अष्टविनायक देवस्थानच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत मांडली.
त्यानुसार हेलिकॉप्टरसाठी हेलीपॅडची निर्मिती करण्यात आल्याचे महागणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगावचे विजयराज दरेकर, वरदविनायक देवस्थान ट्रस्टच्या मोहिनीताई वैद्य, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीचे धनंजय धारप, चिंतामणी देवस्थान ट्रस्टचे विनोद पवार, सिद्धिविनायक सिद्धटेक देवस्थान ट्रस्टचे मंदार देव, मयुरेश्वर देवस्थान ट्रस्ट मोरगावचे आनंद देव, गिरिजात्मक देवस्थान ट्रस्ट लेण्याद्रीचे सदाशिव ताम्हाणे व जितेंद्र बिडवई यांनी दिली. दरम्यान या अविस्मरणीय क्षणाचे चित्रीकरण देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले.