लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील आठवड्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सातत्याने घसरत असलेले कांद्याचे दर आता काहीसे वाढू लागले आहेत. सध्या कांद्याच्या दरात रोज वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे आज मार्केटमध्ये कांद्याला सरासरी ३१०० इतका दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नाशिकच्या लाल कांद्याला देशभरातून मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात रोज वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली असून आज लासलगावसह मनमाड बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त ३ हजार ५०० रुपये तर सरासरी ३ हजार १०० रुपयांचा दर मिळाल्याने कांदा उत्पादकां मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असा काहीसा प्रकार सध्या मार्केटमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यातच तीन महिन्यापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने बसलेला फटका याचा परिणाम म्हणून लाल कांदा काहीसा कमी प्रमाणात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याचे दर हे ३ हजार रुपयाच्या जवळपास पोहचले आहेत.
दरम्यान मागील आठवड्यापासून कांद्याचे दर चांगल्यापैकी वाढत आहेत. दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई काही प्रमाणात भरुन निघण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.