४०० जागांसाठी तब्बल १५०० तिकिटांची विक्री…
त्यानंतर जे झालं ते अत्यंत भयावह.. : अक्षरशः हाहाकार... : दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत १८ ठार..
लोकशाही न्यूज नेटवर्क
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १४ महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यात दोन ट्रेन उशीरा आल्याने गर्दी आणखी वाढली. दिल्ली रेल्वे स्टेशनवर दर तासाला जनरलची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली गेली. ४०० जागांसाठी तब्बल १५०० तिकिटांची विक्री झाली, त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दी अवाक्याबाहेर गेली. त्यातूनच चेंगराचेंगरी झाल्याचे समोर येत आहे.
दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभला जाण्यासाठी स्पेशल ट्रेन येताच एकच गोंधळ उडाला. गर्दी इतकी होती की ट्रेनमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाली. ही घटना रात्री १० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर घडली. घटनेच्या वेळी, प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. किंकाळ्या, आरडाओरडा अन् धावपळ झाली. अनेकांचे श्वास अडकले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
चेंगराचेंगरी होण्यापूर्वी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी इतकी होती की, सगळीकडेच नागरिक ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करत होते. याबाबतचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहे. गर्दीमध्ये अनेक महिला, लहान मुलं दबली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे चेंगराचेंगरी झाल्यानंतर प्रवासी मृतावस्थेत पडल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर, प्लॅटफॉर्मवर सगळीकडेच चपलांचे आणि कपड्यांचे खच दिसत आहेत. गंभीर जखमी झालेले मदतीसाठी वाट पाहत असल्याचे दिसत आहे. मृतांचे नातलग त्याठिकाणी रडत बसल्याचे दिसत आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती खूपच गंभीर होती.
दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, दिल्लीचे उपराज्यपाल आणि अनेक विरोधी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल ऐकून खूप दुःख झाले,” असे राष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवर लिहिले. मी पीडित कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करते.