नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
‘दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निवडणूक प्रचार करताना त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य रोखते का?’ असा उपरोधिक सवाल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला व केजरीवाल यांच्या जामिनाला गुरुवारी पुन्हा विरोध दर्शविला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पणाच्या मुदतीच्या तीन दिवस आधी राऊस एव्हेन्यू न्यायालयात जामिनासाठीची याचिका दाखल केली आहे.
केजरीवाल हे कथित दिल्ली दारू घोटाळ्यात मार्चपासून तिहार तुरुंगात होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र प्रचार संपताच, 2 जून रोजी तिहारमध्ये आत्मसर्पण करावे असा आदेश न्यायालयाने त्यांना दिला होता. केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, अचानक वजन कमी होणे हे जीवघेण्या आजारांचे लक्षण आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या कठोर वर्तनामुळे आपली प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणासाठी आणखी एका आठवड्याचा जामीन मंजूर करण्यात यावा. आपला अंतरिम जामीनाचा कालावधी आपण केवळ निवडणूक प्रचारासाठी वापरला आहे. त्यासाठी फार कमी कालावधीत आपल्याला दिल्ली आणि संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागला आहे. आपल्या तब्येतीत चिंताजनक आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण झाल्याने आरोग्य तपासण्यांसाठी आपल्या जामीनाला मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केजरीवाल यांनी केली आहे.
याबाबत झालेल्या सुनावणी दरम्यान ईडीच्या वतीने केजरीवाल यांना जामीन देण्यास तीव्र विरोध केला. केजरीवाल यांनी नियमित जामीन आणि अंतरिम जामीन अशी दोन्ही मागणी केली होती. केजरीवाल यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात नियमित जामीन अर्जाद्वारे अंतरिम जामीन मागितला असून वैद्यकीय कारणास्तव 7 दिवसांची जामीनवाढ मागितली आहे. या दोन्ही अर्जांवर अनुक्रमे 7 जून व 1 जून रोजी सुनावणी होणार आहे. राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात ईडीतर्फे बाजू मांडणारे अधिवक्ता एस व्ही राजू म्हणाले की केजरीवाल सर्वत्र प्रचारसभा घेत आहेत आणि रोड शो देखील करत आहेत. त्याच्या नियमित आणि अंतरिम जामिनावर आम्ही आमचा जबाब नोंदवू.