लोकशाही संपादकीय लेख
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात २००८ साली भ्रष्टाचाराविरुद्ध पुकारलेले आंदोलन गाजले आणि ते यशस्वीही झाले. या आंदोलनात अण्णा हजारे यांचे प्रमुख सहकारी म्हणून अरविंद केजरीवाल होते. त्याचबरोबर एडवोकेट प्रशांत भूषण, भारताच्या पहिल्या आयपीएस पोलीस अधिकारी किरण बेदी, प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक कुमार विश्वास, कै. शांती भूषण आदी नामांकित सहकाऱ्यांची फौज अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार आंदोलनात सामील होती. खुद्द संपूर्ण भाजप पक्षाच्या वतीने आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दिला होता. अण्णा हजारे आंदोलन कमालीचे लक्षवेधी ठरले होते. सत्ताधारी काँग्रेस पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षाकडून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे भ्रष्टाचार विरुद्धचे आंदोलन लक्षवेधी ठरले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णा हजारेंच्या या बेमुदत उपोषण आंदोलनाला जणू यात्रेचे स्वरूप आले होते.
देशाच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता. त्यात जनता देखील मोठ्या संख्येने सहभागी होती. हजारो कार्यकर्त्यांचा मुक्काम रामलीला मैदानावर आंदोलनात होता. अण्णा हजारे यांचे विश्वासू सहकारी म्हणून अरविंद केजरीवाल भूमिका पार पाडत होते. एकंदरीत या आंदोलनामुळे केजरीवाल लोकप्रिय बनले. आंदोलन संपल्यावर अरविंद केजीवाल यांनी राजकीय पक्ष काढण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला अण्णा हजारेंनी नाकारले, आणि उपोषण संपल्यावर अण्णा हजारे आपल्या राळेगणसिद्धी येथे निघून गेले. राजकीय पक्षाला अण्णांनी पाठिंबा द्यावा म्हणून अरविंद केजरीवाल यांनी त्यांना गळ घातली, पण राजकीय पक्षाला त्यांचा विरोधक होता. परंतु एडवोकेट प्रशांत भूषण, किरण बेदी यांनी केजरीवाल यांना राजकीय पक्ष काढण्यास पाठिंबा दिला. त्यातून आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाची केजरीवालांच्या नेतृत्वात स्थापना झाली.
राजधानी दिल्लीमध्ये भ्रष्टाचार आंदोलनामुळे केजरीवाल व त्यांचे सहकाऱ्यांनी दिल्लीकरांच्या मनावर घर केले होते. दिल्लीकर नागरिक केजरीवाल आणि त्यांच्या आप पक्षाच्या प्रेमात पडले होते. दिल्लीत बरेच वर्षे काँग्रेसची सत्ता होती. २०१३ साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली. एकूण ७० आमदार संख्या असलेला सर्वात मोठा पक्ष म्हणून ‘आप’ला स्थान मिळाले. काँग्रेसच्या सहकार्याने दिल्ली केजरीवाल यांचे नेतृत्वात सरकार बनले. परंतु ते फक्त दोन वर्षे चालले. काँग्रेसने पाठिंबा काढला. दिल्ली सरकार बरखास्त झाले. २०१५ मध्ये केजरीवाल यांच्या आप पक्षाला ६५ जागा मिळून निर्विवाद बहुमत प्राप्त केले. पुन्हा केजरीवाल मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये आणि अरविंद केजरीवाल यांच्यात मतभेद झाले. ते आप मधून बाहेर पडले. सामाजिक कार्य करणाऱ्या केजरीवाल यांना सत्तेची लालूच लागली. त्यांचा अहंकार वाढला. केजरीवाल यांना विरोध करणाऱ्यांना त्यांनी खड्यासारखे बाजूला सारले आणि अनभिषिक्त सम्राटा सारखे ते वागायला लागले..
अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत मिळालेल्या यशामुळे आकाश ठेंगणे दिसू लागले. स्वतःचा एककलमी कार्यक्रम त्यांनी सुरू केला. दिल्लीत गरीब लोकांसाठी त्यांना शिक्षणाच्या सोयी, आरोग्याच्या सुविधा, मोफत वीज, पिण्याचे पाणी, महिलांना फुकट बस प्रवास आदी सुरू केल्याने दिल्लीतील जनतेत त्यांची लोकप्रियता वाढली. २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेत त्यांना पुन्हा ७० पैकी ६२ जागा मिळाल्या. भाजपतर्फे जंग जंग पछाडून सुद्धा आठ जागांपेक्षा जागा ते मिळवू शकले नाहीत. त्यामुळे केजरीवाल यांच्या अहंकारात पुन्हा वाढ झाली. या अहंकारातून मुख्यमंत्र्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून ‘शीश महल’ हा बंगला बांधला आणि तेथे राहायला केजरीवाल गेले. या त्यांच्या विकृतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेला दिल्लीत ओहोटी सुरू झाली असली, तरी त्याला न जुमानता विधानसभेत मनाप्रमाणे ते निर्णय घेऊ लागले. त्यातच पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपला प्रचंड यश मिळाले. तेथे आपचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडू लागले.
केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन करून लढण्याचा विरोधी पक्षांनी निर्णय घेतला. तर त्यात केजरीवाल सहभागी झाले नाहीत. गुजरात, हिमाचल प्रदेश येथे आप तर्फे सत्ता स्थापनेचे ते स्वप्न पाहू लागले. पण त्यात त्यांना अपयश आले. दरम्यान दिल्लीत आप पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अर्थात भ्रष्टाचाराचा आरोप करून केजरीवालांसह त्यांच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकले. त्यांच्याविरुद्ध आपने घेतलेल्या निर्णयाबाबत आपली बाजू मांडण्यात दिल्लीकरांसमोर केजरीवाल अपयशी ठरले. त्याचाच परिणाम म्हणून २०२५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेत ७० पैकी अवघ्या २२ जागा त्यांना मिळाल्या. स्वतः केजरीवाल, उपमुख्यमंत्री शिसोदीया तसेच इतर मंत्री देखील पराभूत होऊन दिल्लीत १२ वर्षाची सत्ता उपभोगल्यानंतर आता त्यांचे पानिपत झाले. मुख्यमंत्री केजरीवाल यांना त्यांचा अहंकार नडला. त्यामुळे दिल्लीकरांच्या मनातून ते उतरले. सर्वसामान्य जनता आपल्या बाजूने असून मध्यमवर्गीय मात्र विरोधात गेले. अखेर आपच्या हातून सत्ता खेचून आणण्यात जनता यशस्वी ठरली..!