गौतम अदानी, सागर अदानीविरोधात अटक वॉरंट

राहुल गांधींनी साधला निशाणा : राजकारण तापले

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी मोठ्या अडचणीत अडकले आहेत. त्यांना अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात फटका बसला आहे. अमेरिकेमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात खटला दाखल करुन घेतला आहे. त्यांच्यासह पुतण्या सागर अदानी यांना अटक वॉरंट बजावले आहे.

अदानी, त्यांचा पुतण्या सागर यांच्यासह सात जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलरच्या लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणात अमेरिकेतली कोर्टात सुनावणी झाली. अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे आता अदानी समूहाने अमेरिकेतमधील 506925 कोटी 44 लाखांचा ( 600 दशलक्ष डॉलर) बाँड रद्द केला आहे.

अदानी ग्रीन एनर्जी या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भारतीय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कॅनडा येथील संस्थागत गुंतवणूकदाराशी भागीदारी केली आणि भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे सरकारी संस्थांसाठी भागीदारीचा करार करण्याचे ठरले. या कराराच्या आडून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून निधी जमा करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांच्यावर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे.

आता या प्रकरणात थेट डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका असल्याचा पण दावा करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदी विजय मिळवल्यानंतर गौतम अदानी यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, अदानी यांनी गुंतवणुकीची घोषणा करताना ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर यापूर्वीच ट्रम्प यांनी ऊर्जा कंपन्यांचे किचकट नियम शिथिल वा सुटसुटीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी गौतम अदानी यांना तातडीनं अटक करा अशी मागणी केली आहे, तसेच या प्रकरणावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे.  “जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहेत, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. आम्हाला माहिती आहे की सरकार अदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही. कारण अदानी जर जेलमध्ये गेले तर मोदीही जातील असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच भाजपानं देखील पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. अमेरिकेत दाखल खटल्यात काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख आहे, आरोप झालेल्या चारही राज्यात आमचं सरकार नव्हतं असं पात्रा यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत दाखल खटल्यात काँग्रेस शासित राज्याचा उल्लेख आहे, आरोप झालेल्या चारही राज्यात आमचं सरकार नव्हतं. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असताना अदानींची गुंतवणूक आली, छत्तीसगडमध्ये बघेल मुख्यमंत्री होते मग पैसे कोणाच्या खात्यात जाणार? राहुल गांधी म्हणतात त्यांच्या कोणत्याही नेत्याची चौकशी करा त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, मग बघेल यांची चौकशी करा, अदानी यांनी राजस्थानमध्ये गुंतवणूक केली तेव्हा देखील तीथे काँग्रेसचंच सरकार होत. भारत आज जगात चौथ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था आहे, ती लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे,  मात्र हे काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला सहन होत नसल्याचं पात्र यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.