लोकशाही न्यूज नेटवर्क
गुन्हा केल्यापासून दोन महिने औरंगाबाद पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपीना जळगावच्या एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, औरंगाबाद सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अजय लीलाधर गोसावी रा. प्रजापत नगर, जळगाव व त्याचा साथीदार मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी रा. तुकारामवाडी जळगाव या दोघांवर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेजण दोन महिन्यांपासून फरार झाले होते. दरम्यान जळगाव स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळालेल्या खबरीवरून दोन्ही संशयित आरोपी हे प्रजापत नगरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, पोलीस नाईक विजय पाटील, परेश महाजन यांनी कारवाई करत संशयित आरोपी अजय गोसावी व मनोज उर्फ मयूर चौधरी यांना शनिवारी २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता प्रजापत नगरातून अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यांना या औरंगाबाद सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.