कारागृहात गोळीबार, 14 जणांचा मृत्यू; 24 कैदी फरार

0

अमेरिकेमधून (America) एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर अमेरिकेमधील मेक्सिकोच्या एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी (Gunmen Attacked Prison) गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 10 सुरक्षा रक्षकांसह 4 कैद्यांचा समावेश आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील (Mexican City) सिओडाड जुआरेजमधील (Ciudad Juarez) एका तुरुंगावर अज्ञात बंदुकधारींनी हल्ला केल्याने 14 जण ठार झाले असून 24 कैदी पळून गेले आहेत.

चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्यूटरच्या (Chihuahua State Prosecutors) कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हल्ल्यादरम्यान अज्ञात बंदुकधारींनी Armored Vehicles चा वापर केला होता. मृतांमध्ये 10 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. तर चार कैंद्याचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

दरम्यान स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षानिमित्त काही कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी कॅम्पसबाहेर थांबले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर कारागृह आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तुरुंगात काही कैद्यांनी अनेक वस्तूंना आग लावली आणि कारागृहाच्या सुरक्षारक्षकांशी झटापट केली, असं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर चार कैद्यांचा मृत्यू झाला, तर गोंधळाचा फायदा घेत 24 कैद्यांनी कारागृहातून पळ काढला. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू असून पळून गेलेल्या कैंद्याचाही शोध सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.