“१५०० देता, आम्ही भिखारी आहे का?”
लाडकी बहीण नको पण सुरक्षित बहिण योजना पाहिजे : काय करायचीय तुमची लाडकी बहिण योजना?
बदलापूर
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बदलापूरकर संतप्त होत रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करत ट्रेनही थांबवल्या आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोशियन, स्कूल बस असोसिएशनचा बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी नागरिक करत आहेत. नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केले असून अनेक मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा जाहिरातबाजी सुरू आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत, दुसरीकडे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना घडूनही पोलीस प्रशासन कारवाईत टाळाटाळ करत आहे.
संतप्त बदलापूरची जनता उतरली रस्त्यावर
याचाच निषेध म्हणून ‘साहेब आम्हाला एकवेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, पण सुरक्षित बहिण योजना पाहिजे’, अशा आशयाचे बॅनर्स झळकावत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रेल्वे रुळावर आंदोलनाला बसलेल्या एका महिलेला प्रतिक्रिया विचारली असता तिने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. “महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकार होतायत. सरकार काहीच करत नाहीय. जिथे हे प्रकार घडलेत, त्यांना तसेच कापा. एका माणसामुळे सगळी पब्लिक सकाळी सहा वाजल्यापासून इथे बसली आहे. तुम्ही त्याला सुरक्षा देता. पब्लिकला, मुलीला सुरक्षा देत नाही. सरकार काय करतय? लाडकी बहीण योजना आणता, त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या. काय करायचीय तुमची लाडकी बहिण योजना? 1500 रुपये देता, भिखारी आहे का?” अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली.