Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»झाडे अशुभ असतात की आपणच त्यांच्या प्रेमाची किंमत विसरलो?
    लोकशाही विशेष

    झाडे अशुभ असतात की आपणच त्यांच्या प्रेमाची किंमत विसरलो?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 29, 2026No Comments85 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    काही दिवसांपूर्वी माझ्या घरातील एका छोट्याशा घटनेने मनात अनेक प्रश्न निर्माण केले. घराच्या टेरेसवर मी वर्षानुवर्षे जपलेले एक केळ्याचे झाड होते. एखाद्या मुलाला वाढवावे तसे मी ते वाढवले होते. रोज पाणी घालणे, खत टाकणे, उन्हापावसाची काळजी घेणे, नवीन पान फुटले की आनंदाने त्याच्याकडे पाहत राहणे, हे सारे माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले होते. त्या झाडाच्या पानांवर अनेकदा देवाचा नैवेद्य दाखवला गेला होता. सण-उत्सवात त्याची पाने उपयोगी पडली होती. घरात आलेल्या पाहुण्यांनाही त्याचे कौतुक वाटायचे. पण एके दिवशी कोणीतरी सहज म्हणून गेले, “घरात केळ्याचे झाड ठेवायचे नसते, ते अशुभ असते. ”

    फक्त एक वाक्य. आणि घरातील वातावरण बदलले. काही तासांतच ते झाड टेरेसवरून खाली हलवण्यात आले. त्या क्षणी माझ्या मनात आलेली हुरहूर शब्दांत सांगणे कठीण आहे. कारण हलवले गेले होते फक्त एक झाड नव्हते, तर त्याच्याशी जोडलेल्या माझ्या भावना होत्या. त्या दिवशी मी स्वतःलाच प्रश्न विचारला – जे झाड आपल्याला सावली देते, ऑक्सिजन देते, फळ देते, धार्मिक कार्यात उपयोगी पडते, ते अचानक अशुभ कसे होऊ शकते?

    हा प्रश्न मला माझ्या बालपणात घेऊन गेला. माझ्या माहेरी आम्ही एक शेवग्याचे रोप लावले होते. सुरुवातीला ते अगदीच छोटे होते. पण हळूहळू ते वाढले. वर्षानुवर्षे त्याची काळजी घेतली गेली. एक दिवस असा आला की ते झाड अक्षरशः शेंगांनी लगडून जायचे. इतक्या शेंगा यायच्या की घरातील वापर करूनही संपत नसत. मग त्या शेजाऱ्यांना दिल्या जायच्या. नातेवाईकांना दिल्या जायच्या. काही वेळा पोती भरून बाजारात विकायलाही नेल्या जायच्या.

    त्या झाडामुळे कित्येक घरांच्या स्वयंपाकघरात भाजी शिजली असेल. कित्येक मुलांच्या ताटात पौष्टिक अन्न गेले असेल. कित्येकांना आनंद मिळाला असेल. पण एक दिवस कोणीतरी सांगितले की शेवग्याचे झाड घराजवळ ठेवणे अशुभ असते. आणि ते झाड तोडले गेले. आजही त्या जागेकडे पाहिले की मनात एक पोकळी निर्माण होते. कारण मला आठवते ते झाड अशुभ नव्हते. उलट ते तर उदार होते. माणसांपेक्षा अधिक उदार.

    आपल्या समाजात झाडांबाबत अनेक समजुती आहेत. काही झाडे शुभ, काही अशुभ. काही झाडे धन आणतात, काही संकट आणतात. पण निसर्गाच्या दृष्टीने पाहिले तर या संकल्पनांना काही अर्थ उरत नाही. झाडाला शुभ-अशुभ माहीत नसते. त्याला फक्त वाढणे माहीत असते. त्याला फक्त देणे माहीत असते. एक आंब्याचे झाड उन्हाळ्यात गोड फळे देते. लिंबाचे झाड घराला चव देते. कडुनिंब औषध देतो. केळे अन्न देते. शेवगा पोषण देतो. तुळस औषधी गुण देते. गुलाब सुगंध देतो.

    ही सर्व झाडे आपल्याला काही ना काही देत असतात. बदल्यात त्यांना लागते फक्त थोडेसे पाणी, थोडीशी माती आणि थोडेसे प्रेम. कदाचित म्हणूनच मला झाडे नेहमी माणसांपेक्षा श्रेष्ठ वाटतात. कारण माणूस उपकारांची परतफेड मागतो. झाड कधीच मागत नाही. माणूस कधी कधी जात, धर्म, भाषा, श्रीमंती किंवा गरिबी पाहतो. झाड तसे करत नाही. त्याची सावली सर्वांसाठी सारखीच असते. त्याची फळे सर्वांसाठी सारखीच असतात. त्याचा प्राणवायू सर्वांसाठी सारखाच असतो.

    आज जग हवामान बदलाच्या संकटाशी झुंज देत आहे. शहरांमध्ये उष्णता वाढत आहे. पक्षी कमी होत आहेत. पावसाचे चक्र बदलत आहे. अशा काळात प्रत्येक झाड म्हणजे पृथ्वीच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. माझ्या टेरेसवरील झाडे माझ्यासाठी फक्त सजावट नाहीत. ती माझे कुटुंब आहेत. सकाळी त्यांच्याकडे पाहिले की दिवस चांगला जातो. एखादे नवीन फूल उमलले की आनंद होतो. एखाद्या झाडाला फळ लागले की जणू घरातील मुलाला यश मिळाले असा अभिमान वाटतो.

    कधी कधी मला वाटते, आपण झाडांपासून खूप काही शिकू शकतो. मुळे जमिनीत घट्ट रोवून ठेवायची. आकाशाकडे वाढत राहायचे. दगड मारणाऱ्यालाही फळ द्यायचे. आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता देत राहायचे. आज जेव्हा कोणी एखाद्या झाडाला अशुभ म्हणते, तेव्हा मला त्या शब्दापेक्षा त्या झाडाचे आयुष्य दिसते. त्याने दिलेली फळे दिसतात. त्याच्या फांद्यांवर खेळणारे पक्षी दिसतात. त्याच्या सावली त विसावलेली माणसे दिसतात. आणि मग मनातून एकच आवाज येतो…

    जगाला जीवन देणारी कोणतीही गोष्ट अशुभ असू शकत नाही. अशुभ असू शकते ती अज्ञानाची भीती. अशुभ असू शकतो तो निसर्गापासून दूर जाण्याचा विचार. पण झाड?

    झाड कधीच अशुभ नसते.
    कारण झाड म्हणजे केवळ खोड,
    पाने आणि फांद्या नसतात.
    झाड म्हणजे श्वास असतो.
    झाड म्हणजे अन्न असते.
    झाड म्हणजे आठवणी असतात.
    झाड म्हणजे प्रेम असते.
    आणि प्रेम कधीच अशुभ नसते.

    अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे
    पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई
    मो. ९८९२१३८१३२

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!

    August 11, 2026

    प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!

    August 10, 2026

    फ्रीलांस करिअरच्या संधी

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif