
लोकशाही विशेष लेख
वैदिक धर्मावर महाभयंकर सावट आले असताना एक महापुरुष, महामानव आपल्या भारत वर्षात जन्माला आले त्यांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. त्यासाठी अलोट श्रम घेतले, विषम परिस्थितीत ते कणखरपणे उभे राहिले. भारताच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक एकतेसाठी प्रयत्न करून चारी दिशेला चार मठ स्थापन केले ज्योतिर्मठ, शृंगेरी शारदा मठ, गोवर्धन मठ, द्वारका शारदा पीठ. धर्मसत्तेबरोबर राजसत्तेचा आधार त्यांनी प्रथम मिळवून दिला. वयाच्या अवघ्या 32 वर्षांमध्ये यशोमंदिराच्या शिखरावर ते आरुढ झाले. 21 एप्रिल मंगळवार रोजी आद्य शंकराचार्यांच्या जयंती दिनानिमित्त हा अल्पसा त्यांच्या जीवनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न…
आद्य शंकराचार्य यांचा इसवी सन 788 ते 820 हा काल होता. वैशाख शुद्ध पंचमीला, केरळ मधील कलाडी या गावी शिवगुरू व विशिष्टादेवी यांच्या पोटी ब्राह्मण कुटुंबात, एक टपोऱ्या डोळ्यांचा सुदृढ बांध्याचा व सतेज चेहर्याचा, शिवशंकराच्या कृपेने ईश्वरी प्रसाद जन्मास आला त्याचे नाव ‘शंकर’ ठेवण्यात आले. दीड वर्षाचा हा सानुला पित्याबरोबर पुरुष सूक्त म्हणत असे. त्याची प्रगल्भ बुद्धी हा गावात चर्चेचा विषय झाला. लौकिक अर्थाने बाल हा लहान असला तरी त्याचे बौद्धिक वय मोठे होते.
शिवगुरूला लोक म्हणत तुला लाभलेलं हे कैवल्यलेण आहे. त्याचे लवकर मौजी बंधन करून त्याला गुरुगृही पाठव. मुळातच पूर्वी अनेक जन्मात संचय केलेले ज्ञानधन, शुद्ध चारित्र्य व संवेदनक्षम मन घेऊन बाळ जन्माला आला होता. त्यामुळे आठव्या वर्षी सर्व वेदांचे ज्ञान व बाराव्या वर्षी शास्त्राचे ज्ञान यात तो पारंगत झाला. गुरुगृही तो सहज रुळला. अनेक शास्त्री, वेदांती, पंडित यांच्या चर्चासत्रात तो सहज विजयी होई शंका निरसन करून पुढे जाई. त्यामुळेच लवकरच सर्वजण त्याला “बाल आचार्य” असे संबोधू लागले.
बाळ सर्वज्ञ असल्याने, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला स्वस्थता लाभेना. वैदिक धर्माची, विश्व बंधुत्वाची कल्पना लोकांना विस्ताराने सांगायला हवी. लोककल्याणाचे हे दायित्व माझ्याकडे नाही? काय मग माझ्या बुद्धीचा, आरोग्य संपन्न देहाचा आणि माझ्या जगण्याचा उपयोग तरी काय? असा प्रश्न त्यांच्या मनी आला व त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. त्यांच्या मातेने प्रथम त्यांना थोडा विरोध केला पण शेवटी एक अट घातली की जगाच्या पाठीवर तू कुठेही असशील तरी माझा अग्निसंस्कार करायला ये. ती मान्य करून आचार्य बाहेर पडले.
नर्मदातटी त्यांना भागवत पूज्यपाद गोविंद यतींची त्यांना माहिती मिळाली. एका गुहेत ते राहत होते. गुहेचे दार निमुळते होते. त्यांनी विचारले, कोण आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले. .
चिदानंद रूपं शिवोsहं…
त्यांच्या मुखातून आत्मष्टक बाहेर आले. यती महाराज प्रसन्न झाले. पूर्ण तयारीने आलेल्या आपल्या या शिष्याला संन्यास दीक्षा दिली.
आर्य सनातन धर्म अधोगतीला चालला होता. बौद्ध व जैन धर्माचे अवडंबर माजले होते. हिंदू धर्मात अनेक पंथ शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सर्वांमध्ये वैरभाव वाढला होता. धर्म संस्थापनेच्या दृष्टीने ही गोष्ट घातक होती. लोकमानसात परिवर्तन होण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले. सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच देव पाहण्याची क्षमता लोकांमध्ये नव्हती. हे सारे लवकर बदलले पाहिजे म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. “जीव ब्रह्मैव नापरः व ब्रह्म सत्य जगतमिथ्या” या अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार त्यांनी केला. यासाठी त्यांनी ब्रह्मसूत्र, उपनिषद, भगवत गीता यावर भाष्य केले. “विवेक चुडा मणी” सारखा ग्रंथ लिहिला. आचार्यांवर सरस्वतीचा वरदहस्त असल्याने त्यांच्या मुखातून साक्षात वाक्गंगा अखंडपणे अवतरत राहिली.
बाल आचार्यांच्या लहान वयातच याचा प्रत्यय येऊ लागला. गुरुगृही असताना भिक्षावळ मागायला जाताना “ओम भवती भिक्षां देही”असे म्हणत ते एका घरापुढे थांबले. त्यातून एक गृहिणी बाहेर आली अन्नाचा कण ही तिच्या घरात नव्हता. तिने घरात काही आवळे होते ते दिले व माझ्याकडे काही नाही असे तिने सांगितले. बाला आचार्यांना गहिवरून आले त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी डोळे मिटून श्री लक्ष्मीची प्रार्थना केली. त्यांच्या मुखातून कनकधारा स्तोत्र आले. शेजारील घरी एक धनाढ्य व सधन दानशूर म्हणणारे गृहस्थ होते त्यांनी हवे ते दान देण्याची तयारी आचार्यांना दाखवली पण त्यांनी ते स्पष्ट नाकारली. ‘शेजारी इतके अठराविश्व दारिद्र्य असताना तुम्हाला लक्षात आले नाही का?’ या विचाराने ते खजील झाले. आपली चूक त्यांना समजली. सोन्याचे आवळे करून त्यांनी शेजारील गृहिणीला पाठवले. कनकधारा स्तोत्राचा हा वरद प्रत्ययच म्हणावा लागेल. आचार्य केवळ तत्वज्ञ नव्हते तर ते समाजसुधारक होते.
अनेक सुमधुर स्तोत्र त्यांनी सहज रचली. जी आज पूजेमध्ये नित्य गायली जातात. त्यात भीमातटीच्या पांडुरंगाचे वर्णन करणारे, काशी विश्वनाथ येथील कालभैरवाचे वर्णन करणारे, शिवस्तुती करणारे, नर्मदेचे महत्त्व सांगणारे, गंगेचे महत्व सांगणारे गंगा स्तोत्र तसेच मणकर्णिका स्तोत्र, कृष्णाची, गणपतीचे वर्णन करणारी भाव मधुर स्तोत्रे या अक्षयभाव प्रदान करणाऱ्या रचना आहेत.
त्या त्या आराध्य दैवताविषयी परमप्रेम निर्माण करणारी अशी ही स्तोत्रे आहेत. त्यांचे भज गोविंदम हे स्तोत्र मात्र मनुष्य जन्माचे महत्त्व सांगणारे आहे. थोडे स्पष्ट व परखड मत यात मांडले गेले आहे. एक अतिशय वृद्ध गृहस्थ ‘व्याकरणाचे पाठ’ पाठ करीत असताना आचार्य त्याला उद्देशून म्हणतात, “भज गोविंदम मूढमते” ज्ञानाची लालसा वाईट नाही पण कोणत्या वयात काय करावे हा विवेकही लागतो कारण आयुष्य वेगाने पुढे जाते. बालपण खेळण्यात जाते, तरुणपण संसारात रममाण होते व वृद्ध काळी नाना चिंता निर्माण होतात. मग या सगळ्यांमध्ये परब्रम्हाविषयी किंवा भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हायला कोणाकडेही सवड नसते म्हणून जनमानसाला ते उपदेश करतात “भज गोविंदम्”.
हिंदू धर्माला संकुचित विचारांमधून बाहेर काढून एकात्मता निर्माण करण्याचे फार मोठे कार्य आद्य शंकराचार्य यांनी केले पण म्हणतात ना, ‘जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण’. त्यांच्या मातेचा अंत समय जेव्हा जवळ आला तेव्हा शब्द दिल्याप्रमाणे ते तिथे आले. मातेला त्यांनी तसे वचन दिले होते पण तत्कालीन समाज व्यवस्थेने पुन्हा त्यांनी संन्यास धर्म घेतला आहे म्हणून अग्निसंस्काराचा अधिकार नाही असे प्रतिपादन करून अग्नी उपलब्ध करून दिला नाही. तेव्हा योग सामर्थ्याने मंत्रोच्चार करून त्यांनी अग्नी निर्माण केला व आईवर अंत्यसंस्कार केले. असा पुत्र ज्या मातेला लाभला ती माता खरंच भाग्यवान. व त्याही पुढे जाऊन आपल्या भारत मातेला हा सुपुत्र लाभला हे आपलं महद्भाग्य.
आज पुन्हा एकदा सनातन हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध होऊया हेच खरे आद्य शंकराचार्यांसाठी अभिवादन ठरेल.
भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

