महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तुत्वाला सलाम
जीवाची पर्वा न करता गिरणेत उडी मारून वाचवला चिमुकल्याचा जीव
मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील कानळदा येथील गिरणा नदीच्या तीरावर असलेल्या महर्षी कणवाश्रमात ऋषिपंचमी निमित्त दरवर्षी महिला भाविकांची हजारोच्या संख्येने गर्दी असते. महिला भाविक नदीमध्ये आंघोळ करून महर्षी कण्वऋषींच्या गुफेमध्ये पूजा करतात. यावर्षीही दर वर्षाप्रमाणे हजारोंच्या संख्येने महर्षी कण्वाश्रमात व नदिकाठावर महिलांची वर्दळ होती. अशी कल्पना सरपंच पुंडलिक सपकाळे यांना असल्यामुळे त्यांनी कालच पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन पूर्व कल्पना देऊन विशेष बंदोबस्तची विनंती केली होती. त्यासाठी तालुका पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष करून महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा बंदोबस्त पुरवलेला होता.
दरम्यान, कानळदा येथील गिरणा नदीत बुडणाऱ्या मुलाचा पोलीस कर्मचारी कु.पौर्णिमा कैलास चौधरी (नवप्रविष्ठ महिला कॉन्स्टेबल) यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता गिरणा नदीच्या पात्रात उडी मारून 10 वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले.
हजारो महिला आश्रमाला लागून असलेल्या घाटावर आंघोळ करत असताना एक मुलगा पूजेमध्ये असलेले पैसे उचलण्यासाठी अचानक नदी काठावर गेला असताना पाय घसरून पडला व नदीमध्ये बुडत असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याने पहिले. मुलगा पाण्यात बुडत असल्याची खात्री पटताच क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लागलीच पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले व त्याचे प्राण वाचविले. या महिला कर्मचाऱ्याच्या धाडसाचे उपस्थित महिला भाविक महर्षी कणवाश्रमाचे विश्वस्त तसेच सरपंच व सदस्यांमार्फत परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक तथा गावाचे सरपंच पुंडलिक सपकाळे, महर्षी कनवाश्रमाचे पूज्य अदैत्वानंदजी सरस्वती महाराज, उपस्थित महिला व परिसरातील लोकांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.