समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रगती योजना (कॅस) लागू
"मास्वे" च्या लढ्यास यश : सहकार्य करणाऱ्या सर्वांचे व्यक्त केले आभार
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील आकृषी विद्यापीठातील तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आदि महाविद्यालयातील शिक्षकांना 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला ज्यामध्ये सेवांतर्गत प्रगती योजनेचा (Career Advancement Scheme) समावेश आहे. परंतु सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील समाजकार्य महाविद्यालय शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याकरता 22 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात कॅसची तरतूद करण्यात आलेले नव्हती. पर्यायाने समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक सेवा अंतर्गत प्रगती योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित होते.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (“मास्वे”) या समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सेवांतर्गत प्रगती योजना लागू करावी, ही मागणी सातत्याने सामाजिक न्याय विभागाकडे लावून धरली होती. दिनांक 29 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानूसार सामाजिक न्याय विभागाकडील समाजकार्य महाविद्यालये उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे आता उच्च शिक्षण विभागाने समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षकांना सेवांतर्गत प्रगती योजना लागू करावी अशी मागणी “मास्वे” संघटनेमार्फत सातत्याने करण्यात येत होती.
दरम्यान उपमुख्यमंत्री (गृह) देवेंद्र फडणवीस यांचे पुढाकाराने त्यांचे अध्यक्षतेखाली समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 3 सप्टेंबर 2024 रोजी सकारात्मक बैठक संपन्न झाली. परंतु मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे “मास्वे” संघटनेने याबाबत मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. “मास्वे” च्या प्रयत्न व लढ्याची दखल घेत शासनाने आज दिनांक 14 आक्टोबर रोजी संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षकांना 1-1-2016 पासून सेवांतर्गत प्रगती योजना (कॅस) लागू करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार शासन निर्णय निर्गमित केला.
शासनाच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री (गृह) देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री (वित्त) अजितदादा पवार, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण चन्द्रकांतदादा पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, प्रधान सचिव, उच्च शिक्षण विकास रस्तोगी, प्रधान सचिव, वित्त सौरभ विजय, संचालक उच्च शिक्षण डॉ शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव, उच्च शिक्षण प्रताप लुबाळ, उपसचिव उच्च शिक्षण अशोक मांडे, सहसंचालक उच्च शिक्षण डाॅ प्रकाश बच्छाव, उच्च शिक्षण विभाग, मंत्रालय व संचालनालय येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी याकरता सहकार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे “मास्वे” चे संस्थापक अध्यक्ष प्रा अंबादास ये मोहिते, महासचिव प्रा. संजय फुलकर, उपाध्यक्ष डॉ. उमेश वाणी, संचालक मंडळ सदस्य डॉ. निलेश शांताराम चौधरी व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आभार मानले आहेत.