लोकशाही न्यूज नेटवर्क
लवकरच अॅपल कंपनी भारतात वर्षाला ५ कोटी आयफोन तयार करेल. कंपनीकडून याबाबत तयारी सुरू असून, येत्या २ ते ३ वर्षात हे शक्य होणार असल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हे शक्य झाल्यास जगातील एकूण आयफोनपैकी २५ टक्के ‘मेड इन इंडिया’ असतील.
अॅपलने गेल्या आर्थिक वर्षात भारतात ५८ जाहीर कोटींहून अधिक किंमतीचे आयफोन असेंबल केले होते. अॅपलसाठी आयफोन बनवणारी एक प्रमुख कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने गेल्याच महिन्यात भारतात सुमारे १३ जाहीर कोटींची गुंतवणूक करण्याबाबत घोषणा केली होती. कर्नाटकातील फॉक्सकॉन फॅक्टरीमध्ये पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे. यासोबतच कंपनीची दुसरी फॅक्टरीही उभारण्यात येत आहे.
टाटा समूह बनवणार आयफोन
टाटा समूह देखील भारतात आयफोन निर्मितीमध्ये योगदान देणार आहे. तामिळनाडूमध्ये यासाठी कारखाने सुरू करण्याची टाटाची योजना आहे. दोन वर्षांमध्ये २० असेम्बली लाईन सुरू करण्यात येतील, आणि त्याठिकाणी ५० हजार कर्मचारी असतील असं सांगण्यात येत आहे. टाटा ग्रुपने आयफोन निर्मितीसाठीच कर्नाटकातील विस्ट्रॉन फॅक्टरी देखील विकत घेतली आहे.
भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये भारतातून ५.५ बिलियन डॉलर्सहून अधिक किंमतीचे मोबाईल निर्यात झाले. यामध्ये आयफोनचा वाटा सर्वात मोठा होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग कंपनी होती.