दुचाकी घसरून अपघात; दोघे साडू गंभीर जखमी
जळगाव: दुचाकी घसरून झालेल्या अपघातात उमेश जगन सपकाळे (वय ४७, रा. आव्हाणे, ता. जळगाव) आणि त्यांचे साडू राजेश प्रकाश वाघ (वय २३, रा. पाचोरा) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी, १८ मार्च रोजी दुपारी शिवाजीनगर उड्डाणपुलावर घडला.
उमेश सपकाळे आणि राजेश वाघ कामानिमित्त जळगाव येथे आले होते. परत आव्हाणे येथे जात असताना त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली. या दुर्घटनेत उमेश सपकाळे यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, राजेश वाघ यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर तातडीने खासगी वाहनाने दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.