अनुभूती स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

अनुभूती रेसिडेन्शिअल स्कूलचा ‘वार्षिक क्रीडा दिन’ नुकताच उत्साहात साजरा झाला. अनुभूती स्कूलच्या फुटबॉल मैदानावर सकाळी साडेआठ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन फूड पार्कचे संचालक अथांग जैन आणि अभंग जैन तसेच शाळेचे प्राचार्य देबासीस दास यांची प्रमुख उपस्थिती होती. या वार्षिक क्रीडा दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मैदानी खेळात हिरीरीने सहभाग घेतला होता.

आरंभी वार्षिक क्रीडा दिनाच्या औचित्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्कूलचा विद्यार्थी तुषार याने अशोक जैन यांचा परिचय करून दिला. त्यांच्या हस्ते अनुभूती क्रीडा दिनाचा ध्वज फडकविण्यात येऊन त्यांच्या हस्ते स्पोर्टस् कॅप्टनला मशाल सुपूर्द करण्यात आली. खेळाडूंनी कवायतीच्या माध्यमातून मानवंदना दिली. यामध्ये रेड हाऊस कॅप्टन शाश्वत पाटीदार, ग्रीन हाऊस कॅप्टन राघव अग्रवाल, यलो हाऊस कॅप्टन सारा उबाळे, ब्यू हाऊस कॅप्टन वेद पाटीदार आणि स्कूलचा स्पोर्टस् कॅप्टन सचिन पाटील यांच्यासह त्यांच्या चमुचा सहभाग होता. स्कूलचे स्पोर्टस् डायरेक्टर गोविंद उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली गत तीन दिवसांपासून स्कूलमध्ये विविध मैदानी खेळ खेळले गेले होते. त्या सर्वांचे आज अंतिम सामने खेळले गेले. त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक अॅण्ड फिल्ड लेव्हलचे खेळ खेळले गेले. 100, 200, 400 मीटर धावणे, रिले स्पर्धा, उंच उडी, लांब उडी इत्यादी खेळांचा समावेश होता.

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अथांग जैन यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यशस्वी झालेल्या तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन व संचालिका सौ. निशा जैन यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.