अंतुर्ली बुद्रुक येथील सरपंच अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
भडगाव: अंतुर्ली बुद्रुक (ता. भडगाव) येथील लोकनियुक्त सरपंच उषा भाईदास कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे.
सन २०२२ मध्ये अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून सरपंचपदी निवडून आलेल्या उषा कोळी यांनी आवश्यक मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्याविरोधात छायाबाई संजय गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी झाल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला.
ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर निवड झालेल्या व्यक्तींना ठराविक कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, उषा कोळी यांनी हे प्रमाणपत्र वेळेत न सादर केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
या निर्णयामुळे ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर पुढे काय होणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात तक्रारदार छायाबाई संजय गायकवाड यांच्यातर्फे अॅड. रणजित पाटील कनाशीकर यांनी न्यायालयीन प्रक्रिया हाताळली.