
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील एमटीएस परीक्षेचे संचालक सुभाष महाजन यांची नात अंशिका नचिकेत महाजन हिने “ब्री आणि चिवचिव चिमणी” ची गोष्ट तयार करून अवघ्या ३ वर्ष ७ महिन्याच्या वयातच जागतिक विक्रम केला आहे. जन्मापासूनच विविध गोष्टी ऐकण्याच्या सवयीमुळे तिला बोलता येऊ लागल्यापासून ती हॉलमध्ये फिरता फिरता एकेक वाक्य स्वतःच बोलू लागली. जेवताना, झोपतांना ती आजी, आजोबा, आई, वडिलांकडून गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत नसे. तिला लहानपणापासून डायनासोरच्या गोष्टी, चित्रे, मॉडेल्स खूप आवडत. ती स्वतः डायनासेर बद्दल घरातल्यांना माहिती सांगू लागली व विचारू लागली.
एके दिवशी ती अशीच बडबड करत असलेली तिच्या आईच्या लक्षात आले. आईने तिला ती काय बोलते विचारल्यावर अंशिका म्हणाली मी तुला डायनासोरची गोष्ट सांगते. असे म्हणून तिने तिच्या कल्पनेप्रमाणे रंगवलेली डायनासोरची गोष्ट ऐकवली. असे दोन तीन वेळा झाल्याने तिची गोष्ट रंगात येऊ लागली. गोष्ट ऐकताना तिच्या आईने मोबाईलमध्ये ती रेकॉर्ड केली. आम्हाला गोष्ट ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. आम्ही रेकॉर्डिंग झालेली गोष्ट लिहून काढली. मला एमटीएसची पुस्तके छपाईचा अनुभव असल्याने ती गोष्ट प्रकाशित करायचे ठरविले.
गोष्टीला अनुसरून तिच्या वडिलांनी व आईने ए आय च्या मदतीने चित्रे जमा केली. ए आय च्याच मदतीने मुखपृष्ठही तयार झाले आणि २ मे २५ ला आनंद पब्लिकेशन्स च्या मालकांनी म्हणजे श्री. जितूभाई कोठारींनी छपाई करू दिले. तिच्या आई वडिलांनी इंटरनॅशनल बूक्स ऑफ रेकॉर्डकडे नेंदणी केली अन खरोखर तिची इंटरनॅशनल बूक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. तसे सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड कडून नुकतेच प्राप्त झाले आहे.
बाललेखिका म्हणून सर्वत्र कौतुक
आता अंशिका रामायण महाभारतातल्या गोष्टीही सांगत राहते. पुण्याच्या डॉट्स टू लेटर्स या शाळेत तिने आता बालगटात प्रवेश घेतला आहे. या विश्व विक्रमामुळे तिचे बाललेखिका म्हणून सर्वत्र कौतुक केले जात आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनीही तिचे खास कौतुक केले आहे.

