भद्रावती खंड सहकारी संस्थेची वार्षिक सभा

सहकार क्षेत्राचा विकास आणि आव्हाने यावर सविस्तर चर्चा

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

भद्रावती खंड औद्योगिक बहुउद्यशीय ग्रामीण सहकारी मर्यादित संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४-२५ संस्थेच्या कार्यालयीन ठिकाणी दुपारी १ वाजता पार पडली. सभेचे अध्यक्ष कवडू पावडे यांचे नेतृत्वाखाली ही सभा झाली. उद्‌घाटनप्रसंगी माजी नगरसेवक व संस्थेचे संचालक राजू गैनवार तसेच संस्थेचे उपाध्यक्ष किशोर बावणे, सचिव प्रवीण पावडे, संचालक गजानन जोगी, प्रकाश पिंपळकर आणि महिला संचालिका वंदना गैनवार, सुशीला आवारी व मनीषा तराळे यांसह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. सर्व पाहुण्यांचे पुष्पमाल्यांनी स्वागत करण्यात आले.

सभेचा परिचय व संस्थेचा अहवाल वाचन सचिव प्रवीण पावडे यांनी केला. यावेळी मागील सर्वसाधारण सभेचे वृत्तांत वाचून मंजूर करण्यात आले. पुढे नियम ३४ नुसार २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी बाहेरील कर्ज घेण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली. लेखा परीक्षकांची नेमणूक मंजूर करण्यात आली. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र (जमा खर्च, नफा-तोटा, ताळेबंदी) यांचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय नफा विनियासासाठीही मंजुरी झाली.

सभेचे अध्यक्ष कवडू पावडे यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी शेती आणि अनुषंगिक क्षेत्रांवर भारतातील ६० टक्के लोकसंख्या अवलंबून असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण आखण्याचा उल्लेख केला असला तरी, सहकार क्षेत्र हा प्रामुख्याने राज्य सरकारच्या अधिकारातील विषय असल्यामुळे केंद्राचा अधिकाधिक हस्तक्षेप संघराज्याच्या तत्वाला विरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही सहकार क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद न झाल्याचा आढावा घेतला.

माजी नगरसेवक व संस्थेचे संचालक राजू गैनवार यांनी १९७२ मध्ये संस्थेची स्थापना झाल्यापासून विविध योजनांचे यशस्वी अंमलबजावणीचे उदाहरणे सांगितली. त्यांनी म्हटले की, अनेक कारागीर व मजूरांना कर्ज मंजूर करून आर्थिक मदत दिली असून, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी दिल्या आहेत. विश्वकर्मा योजनेअंतर्गत शासकीय कार्यशाळा आणि स्वयंरोजगार शिबिरे आयोजित केली जात आहेत, ज्यामुळे ग्रामीण स्तरावर आर्थिक विकासाला चालना मिळते.

कार्यक्रमाचे सुचवलेले संचालन प्रशांत बरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र शेंडे यांनी मानले. या बैठकीत दिलीप ठेंगे, विलास दाते, दिलीप मांढरे, गणेश वाणी यांसह अनेक मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.