वडिलांचे ध्येय जोपासणाऱ्या अनिल जैन यांचा गौरव..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव सारख्या ग्रामीण भागात शेतीवर आधारित उद्योग सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रेसर स्थान निर्माण करणारे जैन उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री कै. भवरलालजी जैन यांनी आपल्या हयातीत अनेक यश पादाक्रांत केले.

आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणाऱ्या उद्योग कंपन्यांचे मुख्यालय जळगाव सारख्या ठिकाणाहून चालवण्याची किमया त्यांनी केली. त्यांचा हा आदर्श इतर उद्योगपतींनी घेण्यासारखा आहे. उच्चविद्याविभूषित आयएएस पदवी प्राप्त कै. भवरलाल जैन हे एक निष्णात सनदी अधिकारी होऊ शकले असते. तथापि आपली अशिक्षित माता कै. गौराई यांच्या सांगण्यावरून ‘दुसऱ्याकडे नोकरी कशाला करतो, इतरांना नोकरी देणारा व्यवसाय कर’, हा आई गौराई यांचा आदेश शिरोधार्य मानून अवघ्या ७ हजार रुपयांच्या भांडवलावर छोट्याशा व्यवसायाला सुरुवात करून त्याचा वटवृक्ष बनवला. इतकेच नव्हे तर जगाच्या नकाशावर या वटवृक्षाच्या फांद्या पसरल्या. असे हे एक भवरलालजी जैन नामक अजब रसायन विराळेच म्हणावे लागेल.

आज सहा दशकांमध्ये वार्षिक उलाढाल ७ हजार कोटी रुपये आणि कंपनीत १० हजार सहकाऱ्यांचा समावेश असलेली जैन उद्योग समूह ही शेतीवर आधारित उत्पन्नात अग्रेसर कंपनी बनली आहे. हा आदर्श महाराष्ट्राच्या तसेच जळगाव जिल्ह्याचा स्वाभिमान वाढवणारी आहे. कै. भवरलालजी जैन यांचा वारसा त्यांचे चारही सुपुत्र अशोक भाऊ, अनिल भाऊ, अजित भाऊ आणि अतुल भाऊ हे बंधू अगदी तंतोतंत जोपासत आहेत. ही सुद्धा जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. सध्या भारतात अनेक मोठ्या उद्योगपतींच्या कुटुंबांचे केंद्रीकरण होऊन कुटुंबे विभक्त होत असल्याच्या वार्ता आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा मन विषन्न होते. आणि जैन उद्योग समूहाचे हे चारही भावंड आज ज्या पद्धतीने एकोप्याने आणि प्रेमाने मैत्रीपूर्ण वागत आहेत, हे पाहून उर भरून येते. या चारही भावंडांची मुले उद्योगात सहभागी होऊन ज्या पद्धतीने एक निष्ठेने उद्योग करतात, हे पाहता त्यांची तिसरी पिढी सुद्धा चारही भावंडांसारखी एकरूप राहील. हा विश्वास दृढ करत आहेत, हेच स्पष्ट दिसून येते.

अनिल जैन यांना उद्योग उद्योगात प्रत्यक्ष सहभागी होऊन चार दशके झाली. ते सध्या जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून फार मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. आपले वडील कै. भवरलालजी यांचेकडून व्यवसायाचे व उद्योग चालवण्याचे धडे चारही भावंडांना जसे मिळाले तसे त्यांनाही मिळाले. उद्योगातून नफा मिळवणे हे ध्येय असले, तरी निव्वळ नफ्यावर लक्ष केंद्रित न करता शेतकऱ्यांच्या तोंडावरील हसू पाहणे, हा मुख्य उद्देश वडिलांचा होता. तसाच या चारही भावंडांचा आहे, हे विशेष होय. आपला उद्योग यशस्वीपणे चालवीत असताना केवळ ‘उद्योग एके उद्योग’ न करता अनेक संस्थांमध्ये काम करून सामाजिक कार्य करण्याचा हेतू ते साध्य करत आहेत. शेतकऱ्यांना उद्योजक मानणे हा त्यांचा मूळ विचार आहे. भारतीय शेतीमध्ये उत्पादकता सुधारण्यासाठी जागतिक तंत्रज्ञान आणणे ही त्यांची खरी आवड आहे.

जैन उद्योग समूहाने जवळपास एक कोटी शेतकरी कुटुंबांचे जीवनमान बदलण्यास मदत केली आहे. उद्योग समूहातर्फे दरवर्षी एक लाख शेतकऱ्यांना आमंत्रित करून त्यांना शेती करण्याचे नवीन मार्ग आणि नाविन्यपूर्ण मार्ग शिकवतात. या सर्व बाबींचा विचार करून डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठातर्फे अनिल जैन यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे. ही बाब जळगाव जिल्ह्यासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची असून त्याबद्दल अनिल जैन यांचे अभिनंदन करणे केवळ औपचारिक म्हणता येईल.

जैन उद्योग समूहाला आतापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. संस्थात्मक प्रगतीचे पुरस्कारांची भलीमोठी यादी तयार झाली आहे. त्या पुरस्कारांमध्ये कै. भवरलाल जैन यांना मिळालेली कै. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ‘डॉक्टर’ पदवी आणि भारत सरकार तर्फे मिळालेली ‘पद्मश्री’ ही पदवी मानाचा तुरा म्हणता येईल. त्याचप्रमाणे दरवर्षी अनेक संस्थांकडून चारही भावंडांनी अनेक पुरस्कार स्वीकारले असले, तरी डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठातर्फे मिळालेली डॉक्टरेट पदवी हे त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणारी पदवी म्हणावी लागेल. त्याबद्दल अनिल जैन यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. अनिल जैन हे जैन उद्योग समूहातील उप कंपनी ‘फार्म फ्रेश’ या कंपनीचे अध्यक्षपद सुद्धा सांभाळतात. त्यांचे सुपुत्र अथांग यांनी उच्च शिक्षणानंतर उद्योग समूहात सहभागी होऊन फार्म फ्रेश कंपनी त्यांच्या संकल्पनेतून निर्माण केली आहे, हे विशेष. म्हणजे आपले आजोबा कै. भाऊ, सर्व काका आणि वडील यांचा आदर्श घेऊन अथांग कार्य करत आहे.

अथांगची पत्नी कै. अंबिका जैन म्हणजेच अनिल जैन यांच्या सुनबाई मागे राहतील कशा? गौराई ग्रामोद्योग सुरू करून त्यांनी ग्रामीण उद्योगात आपला ठसा उमटवला आहे. जैन उद्योग समूहाचे हे उगवते तारे आहेत, यात शंका नाही. अनिल जैन यांचे पुनश्च एकदा अभिनंदन…!

Leave A Reply

Your email address will not be published.