
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा दि. 16 मेपासून सुरू होत आहे. दुसऱ्या टप्पा जूनच्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्हा दौरा असून त्यावेळी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा समर्थकांसह प्रवेश निश्चित मानला जात आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही चर्चा होणार आहे.
असा असेल दौरा
खासदार शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होत असून, पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठकी होणार आहेत. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात जून महिन्यात होणार असून त्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे.

