अनन्य ईश्वरभक्ती- भाग- ४
येऽन्येऽरविंदाक्ष-विमुक्तमानिन
स्त्वय्यस्तभावादविशुध्दबुध्दयः।
आरुह्य-कृच्छ्रेण-परं-पदं-ततः-
पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्घ्रयः।।३-१।।
तथा न ते तावकाः क्वचिद्भ्रश्यन्ति
मार्गात्त्वयि बध्दसौहृदाः।
त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया
विनायकानीकपमूर्धसु प्रभो।।३-२।। ॥
एकनाथी भागवत॥
ज्ञानमार्गाचा साधक स्वत:च्या प्रयत्नाने ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न करतो त्यामुळे त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते। व अंतिम साक्षत्काराची अवस्था प्राप्त झाली तरी त्याचे तेथून अध:पतन होऊ शकते। ज्ञानमार्ग अत्यंत कठिण आहे। ज्याच्यात पूर्ण वैराग्य आहे, ज्याने ब्रम्हचर्याचे पूर्ण पालन केले आहे असा साधक ज्ञानमार्गाचे एक अक्षर ऐकण्यास पात्र आहे। “निर्विन्नानां ज्ञानयोगो।-भागवत॥” परंतु भक्तीमार्गात ईश्वराची पूर्ण मदत असल्याने यात अध:पतन होत नाही। प्रपंचात राहून सुध्दा भक्तीमार्गाची साधना करता येते। संतांनी ज्ञानमार्गाच्या साधकाला माकडीच्या पिलाची उपमा दिली आहे। ज्याचा नुकताच जन्म झाला असे माकडीचे पिलू, त्याची आई वानरी त्याला पोटाला बांधून फिरते, त्यामुळे त्याला पतनाची भीती असते, परंतु भक्ताला मांजरीच्या पिलाची उपमा दिली आहे। मांजर पिलाला आपल्या दातात धरुन फिरते, त्यामुळे त्या पिलाला पडण्याची अजिबात भीती नाही, त्याच प्रमाणे अनन्य ईश्वरभक्ताची संपूर्ण काळजी परमेश्वर घेत असल्यामुळे भक्ताचे कधीही अध:पतन होत नाही। भागवताच्या या श्लोकात हेच सांगीतले आहे।
भगवान विष्णु नारदाला सांगतात, “नाऽहं वसामि वैकुंठे, योगीनां हृदये रवै। मद्भक्ता: यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद॥१॥” हे नारदा, मी वैकुंठात राह्त नाही, योग्यांच्या हृदयात सुध्दा राहात नाही, सूर्यबिंबात ही नाही, परंतु, जेथे माझे भक्त प्रेमाने माझे नामसंकीर्तन करतात तेथेच मी राहातो। ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, “तो मी वैकुंठी नसे। भानुबिंबीही न दिसे। योगियांचेही मानसे उमरडोनि जाय। “परि तयापासी पांडवा। मी हारपला गिंवसावा। जेथ नामघोष बरवा करिती माझा।-ज्ञानेश्वरी।” हे अर्जुना, मी जर हरवलो तर मला कोठे शोधायचे तर ज्या ठिकाणी माझे भक्त अत्यंत प्रेमाने माझे नामसंकीर्तन करतात तेथे मी सापडेल।
भक्त ऐसे जाणा जे देही उदास। गेले आशापाश निवारुनी॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जन धन माता पिता॥२॥
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे। काहीच साखडे पडो नेदी॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य।घातलिया भय नरका जाणे॥४॥(७७६)
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरु॥१॥
पढिये [सर्व] देहभाव पुरविता वासना। अंती ते आपणापाशी न्यावे॥२॥
मागे पुढे ऊभा राहे सांभाळीत। आलिया आघात निवारावे॥३॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी। वाट दावी करी धरुनिया॥४॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी। पहावे पुराणी विचारुनी॥५॥ (४७२)
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निर्धार हे वर्म चुको नये॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास । पाहो नये वास आणिकांची॥२॥
तुका म्हणे ऐसा कोणि उपक्षीला नाही ऐकियेला ऐसा कोणी॥३॥ (८८५)
काही न मागे कोणासी। तोचि आवडे देवासी॥१॥
देव तयासी म्हणावे। त्याचे चरणी लीन व्हावे॥२॥
भूतदया ज्याचे मनी। त्याचे घरी चक्रपाणी॥३॥
नाही नाही त्यासमान। तुका म्हणे मी जमान॥४॥तुका-२०२०॥
काही न मागती देवा। त्याची करु धावे सेवा॥१॥
हळू हळू फेडी ऋण। होऊनिया रुपे दीन॥२॥
होऊ न सके वेगळा। क्षण एक त्या निराळा॥३॥
तुका म्हणे भक्तिभाव। तोचि देवाचाही देव॥४॥तु-१४१२॥
आलिया भोगासी असावे सादर। देवावरी भार घालूनिया॥१॥
मग तो कृपासिंधू निवारी साकडे। येर ते बापुडे काय रंक ॥२॥
भयाचिये पोटी दु:खाचिया रासी। शरण देवासी जाता भले॥३॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता। चिंतावा तो आता विश्वंभर॥४॥तु-१६३६॥
दैन्य दु:ख आम्हा न येती जवळी। दहन हे होळी होती दोष॥१॥
सर्व सुखे येती माने लोटांगणी। कोण यांसी आणि दृष्टीपुढे॥२॥
आमुचि आवडी संतसमागम। आणिक त्या नाम विठोबाचे॥३॥
आमुचे मागणे मागो त्याची सेवा। मोक्षाची निर्दैवा कोण चाड॥४॥
तुका म्हणे पोटी साठविला देव। न्यून तो हा भाव कोण आम्हा॥५॥ (१४३२)

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२