अनन्यभक्ती करणाऱ्याची सर्व काळजी परमेश्वर घेतो!

0

 

अनन्य ईश्वरभक्ती भाग-३

जो सर्वस्व ईश्वरावर सोपवून काही न मागता ईश्वराची अनन्यभक्ती करतो त्याची सर्व काळजी परमेश्वर घेतो। ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले, एक नवजात अर्भक, लहान मूल स्वत: काहीच करत नाही, ते आईची आरती, पूजा काहीच करित नाही, त्याचे फक्त आईवर अनन्य प्रेम असते, त्यामुळे आई त्याची न सांगता सर्व काळजी घेते। आई त्याची संपुर्ण जबाबदारी घेते। त्या लहान मूलाचे आईवर कसे एकनिष्ठ प्रेम असते याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रंभेसारख्या रुपवान कितीही स्रिया असल्या व आपली आई कुबडी जरी असली तरी मूलाचे आईवरच अनन्य प्रेम असते। त्यामुळे आई त्याचा संपूर्ण योगक्षेम वहाते। तसेच जो ईश्वरावरच अवलंबून आहे त्या अनन्य भक्ताचे सर्व काम ईश्वर करतो। फक्त ईश्वराव दॄढ विश्वास, श्रध्दा, निष्काम प्रेम पाहिजे। आवडी विठ्ठल गाईजे एकांती। अलभ्य ते लाभ येती घरा॥२॥तु-१०९३॥

“अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ भगवद्गीता-९-२२॥ हा भगवद्गीतेतील एक अत्यंत महात्वाचा श्लोक आहे। जो ईश्वराची अनन्यभक्ती करतो त्याचा संपूर्ण योग्सक्षेम ईश्वर वाहातो।

“योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती, व क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण।

पैं सर्वभावेसी उखिते। जे वोपिले मज चित्ते।

जैसा गर्भगोळु उद्यमाते। कोणाही नेणे॥३३५॥

तैसा मीवाचूनि काही। आणीक गोमटेचि नाही।

मजचि नाम पाही। जिणेया ठेविले॥३३६॥

ऐसे अनन्यगतिके चित्ते। चिंतितसाते मातें।

जे उपासिती तयांते। मीचि सेवीं॥३३७॥

ते एकवटूनि जिये क्षणीं। अनुसरले गा माझिये वाहणी।

तेव्हांचि तयांची चिंतवणी। मजची पडली॥३३८॥

मग तींहीं जें जें करावे। तें मजचि पडिलें आघवें।

जैसी अजातपक्षाचेनि जीवें। पक्षिणी जियें॥३३९॥

आपुली तहान भूक नेणें। तान्हया निकें ते माउलीसीचि करणें।

तैसे अनुसरले जे मज प्राणें। तयांचे सर्व मी करी॥३४०॥

तया माझिया सायुज्याची चाड। तरि तेंचि पुरवी कोड।

कां सेवा म्हणती तरी आड। प्रेम सूये॥३४१॥

ऐसा मनी जो जो धरिती भावो। तो तो पुढां पुढां लागे तया देवों।

आणि दिधलियाचा निर्वाहो। तोही मीचि करी॥३४२॥

हा योगुक्षेमु आघवा। तयांचा मजचि पडिला पांडवा।

जयांचिया सर्वभावा। आश्रयो मी॥३४३॥

जे आपल्या चित्ताने सर्व भावेकरुन माझ्याच ठिकाणी उक्ते विकले गेले आहेत ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील बालक कोणत्याही व्यवहारास जाणत नाही॥३३५ त्याप्रमाणे माझ्याविना ज्यास दुसरे चांगलेच वाटत नाही। ज्यांनी माझ्या प्राप्तीतच आपल्या जीवीताचे सार्थक ठरविले आहे; ॥३३६॥ अशा प्रकारे एकनिष्ठ अंत:करणाने जे माझे चिंतन करुन माझी सेवा-भक्ती करतात, तशी त्यांचीही सेवा मीच करतो॥३३७॥ ते ज्या क्षणी एकनिष्ठेने माझ्या भजन-भक्ती मार्गास लागले त्याच क्षणी त्यांची सर्वतोपरीची चिंता मला पडली॥३३८॥ मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात, ते ते सर्व मलाच करावे लागते। ज्या प्रमाणे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवनाकरिताच पक्षीण जगते॥३३९॥ किंवा आपली तहान भूक काहीही ज्यास कळत नाही अशा आपल्या तान्ह्या लेकरास जे हितकर व सुखकारक असेल ते आईलाच करावे लागते, त्याप्रमाणे जे मला मन:पूर्वक सर्व भाव मजवर टाकून भजले त्यांचे इच्छित सर्व काही मीच करतो॥३४०॥ त्यांना माझ्या ऐक्याची-शुध्द ब्रम्हस्थिती प्राप्तीची इच्छा असेल तर त्यांची तीच आवड पुरवितो; किंवा माझी सेवा च करावी असे ते म्हणतील, तर त्यांच्या व माझ्या मध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो॥३४१॥ असे भक्त आपल्या मनात जो जो हेतू धरतात, तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांस देऊ लागतो आणि जे त्यांना दिलेले असते, त्याचे रक्षणही मीच करतो॥३४२॥ कारण, अर्जुना! ज्याच्या सर्व मनोवृत्तीचा आश्रय एकमेव मीच असतो त्यांचा संपूर्ण योगक्षेम मलाच करावा लागतो॥३४२॥ ज्ञानेश्वरी-अध्याय-९॥

डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

Leave A Reply

Your email address will not be published.