अनन्य ईश्वरभक्ती- भाग- २
मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद् वा॥३८॥
महत्संगस्तु दुर्लभोऽगम्योऽमोघश्च॥३९॥
लभ्यतेऽपि तत्कृपयैव॥४०॥
परा भक्ती व अपरा भक्ती असे २ भक्तीचे प्रकार आहेत। अपरा भक्ती म्हणजे सामान्य भक्ती व परा भक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ अनन्यभक्ती। ही ईश्वरकृपेने, संत, सद्गुरुकृपेने प्राप्त होते। परा भक्ती-सिध्दा भक्ती। तुकाराम महाराजांनी सर्व शास्रांचा सार एका अभंगात सांगीतला..
” वेद अनंत बोलीला, अर्थ इतलाची साधिला॥१॥
विठोबासी शरण जावे। निज निष्ठे नाम गावे॥२॥
सकळ शास्रांचा विचार। अंती इतलाची निर्धार॥३॥
अठरा पुराणी सिध्दांत। तुका म्हणे हाचि हेत॥४॥(३१२८)
वेद अनंत खूप बोलला, ४ वेद, ६ शास्र, १८ पुराणे यांनी अनेक प्रकारचे ज्ञान सांगीतले, पण त्या सर्वांचा एकच सार आहे, परमेश्वराला अनन्य भावाने शरण जावे व त्याचे एकनिष्ठेने नामस्मरण करावे। भागवत सुध्दा भक्तीप्रधान ग्रंथ आहे। व्यासांनी अनेक ग्रंथ लिहून सुध्दा त्यांना मानसीक समाधान मिळत नव्हते, तेव्हा नारदांनी त्यांना सांगीतले भक्ती विषयी काहीतरी लिही। त्याप्रंमाणे भागवत, पुराणे इत्यादि भक्ती विषयक ग्रंथांची रचना व्यासांनी केली व त्यांच्या मनाला खरे समाधान मिळाले। कसलीही अपेक्षा न करता ईश्वरावर अनन्य प्रेम करणे म्हणजे भक्ती असे भक्तीचे स्वरुप आहे।
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक उपाय, ज्ञान सांगीतले। पण गीतेच्या शेवटी एक अत्यंत गूढ रहस्यमय उपाय, सिध्दांत सांगीतला। भगवद्गीतेतील सर्वात रहस्यमय, सर्वात श्रेष्ठ सिध्दांत आहे, “अनन्य ईश्वरभक्ती” म्हणजेच “अनन्यशरणागती”। सर्व भार ईश्वरावर सोपविणे व निवांत राहाणे। अनन्यशरणागती म्हणजे काहीच न करणे, जो काहीच करीत नाही त्याचे सर्व काही ईश्वर करतो। जो शरण जातो तो काहीच करीत नाही। स्वत:ची कसलीही चिंता न करता दृढ विश्वासाने ईश्वरावर सर्व सोपविणे। “देह राहो अथवा जावो। पाण्डुरंगी दृढ भावो॥तुका म।” “हेचि थोर भक्ती आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची॥१॥ ठेवीले अनंते तैसेची राहावे। चित्ती असो द्यावे समाधान॥२॥ वाहिल्या उद्वेग दु:ख चि केवळ। भोगणे ते फळ संचिताचे॥३॥ तुका म्हणे घालू तयावरी भार। वाहू हा संसार देवा पायी॥४॥“
भगवान सांगतात, अर्जुना तू माझा अनन्य भक्त आहे म्ह्णून खास तुझ्या साठी मी १ अनमोल सिध्दांत सांगतो, भगवद्गीतेत जे मी अनेक उपाय सांगीतले ते तू काहीच करु नको, एकच कर, सर्व अभिमानाचा त्याग करुन तू मला अनन्यभावाने शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन ज्ञानेश्वरीचा, भगवद्गीतेचा सर्वश्रेष्ठ सिध्दांत म्हणजे, सर्व अभिमान, अहं चा त्याग म्हणजेच अनन्यशरणागती।
सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्।।१८-६४।।
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे।।१८-६५।।
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः।।१८-६६।।
पै आपुलेनि भेदेविण। माझे जाणणे जे एकपण।
तयाचि नाव शरण मज येणे गा॥१८-१३९८॥
सांडूनि मीठपणाचा लोभु। मीठे सिंधुत्वाचा घेतला लाभु।
तेवी अहं देऊनी मी शंभु शांभवी जाहलो ॥१-६३॥
मीठाने आपला मीठ पणाचा अभिमान सोडला तर मीठ साक्षात समुद्र च होते, त्याप्रमाणे माझा अहं शिव-शक्तीला अर्पण करुन मी शिवशक्तीरुप झालो। ॥अमृतानुभव॥

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

