लोकशाही संपादकीय लेख
एक नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर निघालेली काँग्रेससह विरोधकांची प्रचंड रॅली लक्षणीय ठरली. एका काँग्रेस पक्षाची ही रॅली नव्हती. काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये सर्व विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांनीही उपस्थिती दिली. रामलीला मैदानावर जेवढे लोक होते, तेवढेच लोक रामलीला मैदानाच्या बाहेरदेखील होते. ही इंडिया आघाडीची रॅली पूर्णपणे यशस्वी झाली, याचे द्योतक आहे. यापूर्वी याच रामलीला मैदानावर १९७४ मध्ये जयप्रकाश नारायण यांची प्रचंड रॅली इंदिरा गांधी यांच्या राजकारणाविरोधात निघाली होती. जयप्रकाश नारायण यांच्या रॅलीमध्ये ‘सिंहासन खाली करो’ असे नारे दिले जात होते. प्रचंड जनक्षोभ इंदिरा गांधींच्या विरोधात होता. त्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सामील झालेला होता. त्यानंतर २०११ मध्ये अण्णा हजारे यांचे याच रामलीला मैदानावर मोठे उपोषण आंदोलन झाले होते. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे हे उपोषण आंदोलनाला बसले होते. अण्णा हजारे यांचे आंदोलनसुद्धा यशस्वी झाले होते आणि मनमोहन सिंग यांचे सरकार त्यावेळी सत्तेतून खाली खेचले गेले होते. आता रामलीला मैदानावर जी इंडिया आघाडीची रॅली निघाली होती, ती त्या दोन आंदोलनांच्या तुलनेने अधिक जबरदस्त निघाली होती. त्यात राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची जी भाषणे झाली, ती अत्यंत प्रभावी झाली. जेणेकरून त्यांची दखल सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागेल. एक नोव्हेंबरच्या इंडिया आघाडीच्या रॅलीआधी रामलीला मैदानावरच अभिरूप न्यायालय भरविण्यात आले होते. तर त्या अभिरूप न्यायालयामध्ये देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करून देशद्रोहाचा खटला त्यांच्या विरोधात चालवावा, अशी मागणी करण्यात आली. या अभिरूप न्यायालयातही सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे अत्यंत प्रभावीपणे झाली. इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जावे लागेल. त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही जावे लागेल, असा इशारा आपल्या भाषणातून दिला. २ ऑक्टोबरला ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू झालेले नवी दिल्लीतील आंदोलन तसेच संपूर्ण देशात सुरू झालेले आंदोलन तीन आठवड्यांच्या कालावधीनंतर थंड पडले, असे सत्ताधाऱ्यांना वाटत असताना एक नोव्हेंबरची इंडिया आघाडीची रामलीला मैदानावर निघालेली रॅली सगळ्यांच्या झोपा उडवणारी ठरली. इतकी ही रॅली प्रचंड प्रमाणात असेल, असे कोणालाही वाटले नव्हते. ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर प्रणालीप्रकरणी घेतलेल्या निर्णयासंदर्भात लोकांमध्ये फार मोठा असंतोष आहे. एक नोव्हेंबरला नवी दिल्ली राजधानीतील सर्व रस्ते रामलीला मैदानाकडे संपूर्ण भरून वाहत होते. त्यामध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स लक्ष वेधून घेत होता. हातात फलक आणि तोंडात घोषणा, ‘वोट चोर गद्दी छोड’ अशा घोषणांनी रामलीला मैदान दणाणून गेले होते. त्यावेळी सत्ताधारी नेत्यांची झोप उडाली होती. आता एवढ्या प्रचंड रॅलीची आणि त्यानंतर जनतेच्या असंतोषाची दखल घ्यावीच लागेल, असे हे दृश्य होते. रॅली अत्यंत शांतपणे पार पडली. रामलीला मैदान त्यामुळे दणाणून निघाले. शेवटी पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. एवढ्या प्रचंड रॅलीला पोलीस संरक्षण देण्याव्यतिरिक्त काहीही करता आले नाही. त्यामुळे आंदोलनातील हवा कमी झाली, असे ज्यांना वाटत होते, तेच आंदोलन पुन्हा उफाळून आले आणि हे आंदोलन आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत चालूच राहील, एवढे मात्र निश्चित.

