लोकशाही विशेष लेख
उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे 15 पुरस्कार मिळालेल्या ‘संघर्षाचं सोन’ या आत्मकथनानंतर कवी त्यात्याराव चव्हाण यांनी आपल्या 65 व्या वाढदिवसानिमित्त ६५ विविध कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित करुन जगण्याची उमेद निर्माण केली आहे. भावनांना शब्दांचा स्पर्श झालेला ६५ कवितांचा हा काव्यसंग्रह आहे.
‘भावतरंग’ काव्यसंग्रह कवीच्या संघर्षाची, देशभक्तीची, सामाजिक चिंतनाची, वैचारिक उंचीची आणि एकात्मता, समता या मूल्यात्मक विचारांची ओळख कविता वाचत असताना शब्दातून होते.
‘पावन करण्या भारतभुला,
बळी गेले बहु मोती ।
आक्रमणाच्या भडकत्या ज्वाला,
शमवू जागेवरती ।
भारत भूमीच्या थोर हुतात्म्यांची आठवण सदैव असावी असा मानणारा कवी, ‘सदैव’ या कवितेतून आपणास दिसतो. भावतरंग या काव्यसंग्रहातील कविता परिवार, निसर्ग, शेतकरी, नातेसंबंध, शिक्षण, प्रगती, कल्लोळ, सहकाराची भावना, जीवन जगण्याचा मंत्र, एकजुटीचं तंत्र समजावून सांगतात. ‘आम्ही सारे’ या कवितेत कवी एकतेच्या भावना व्यक्त करताना म्हणतो.
‘कुणा आवडो, वा कुणा नावडो
समता ही काळाची गरज खरी
सद्भावाने जगू या, प्रेमे जगवू या
स्वातंत्र्य सुखोपभोग घ्या भुवरी’
जीवनभर कष्ट करणाऱ्या आणि बिकट परिस्थितीवर मात करून शिकवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या आई आणि बाबा वगुरुजन आणि विद्यार्थी यांना कवीने हा भावतरंग काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे.
तात्याराव चव्हाण हे शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या कवितेत समता, स्वातंत्र्य देशभक्ती, सामाजिक भान नातेसंबंध यासह निती मूल्यांची गुंफण दिसते. लेखक तथा माजी शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांची प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांची पाठराखण भावतरंग या काव्यसंग्रहाचे महत्व अधोरेखित करते. छत्रपती संभाजीनगर येथील कैलास पब्लिकेशन यांनी ‘भावतरंग ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे.
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नातेसंबंध जपत असताना काय करायला पाहिजे. हे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यांच्या अतुलनिय जोडणीतून ‘नाते जपा ‘या कवितेतून कवी म्हणतो,
‘जुन्या विरुद्ध लढण्यासाठी
वही पेन हाती लेखन पाटी
वाचाल ग्रंथ मजबूत मस्तक
नवीन तंत्र अभिनव संगणक’
मनाच्या भावनांना शब्दांमध्ये गुंफणारा कवी बळीराजाची स्थिती मांडतो. शेतकऱ्याचे दुःख, वेदना शब्दाच्या रुपाने समाजापुढे माणसांना म्हणतो,
‘चांगले पीक येईल
मनी होती आसं
सततच्या पावसाने
केले सत्यानाश
नदीचे पोट फुगले
संसार थाटे वावरात
वेदना सांगू कुणा
चिंता करतो दिनरात’
तात्याराव चव्हाण शिक्षकी पैशातून सेवानिवृत्त झाले पण काव्यरुपाने साहित्य निर्मितीतून ते समाज शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याचा प्रत्यय त्यांच्या कवितेच्या प्रत्येक शब्दात ओळी ओळीतून दिसून येतोय. कवीच्या मन पटलावर उमटलेले हे भाव तरंग वाचकांना आवडतील. भावनांना शब्दांचा स्पर्श झालेल्या ६५ कवितांच्या या भावतरंगांचे वाचक स्वागत करतील हा आशावाद आहे. तात्याराव चव्हाण यांच्या लेखन कार्याला हार्दिक शुभेच्छा.

चाळीसगाव
मो. 8275725423