भुसावळातील ‘अमृत पाणी योजना’ वादाच्या भोवऱ्यात!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या तीन महिन्यांपासून नव्याने सुरू झाले असतानाही, जामनेर रोडवर उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम अचानक बंद केल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे शहरालगत वाहणारी तापी नदी असताना भुसावळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वळवण भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरांसाठी अमृतपाणीपुरवठा योजनेचे पिण्याचे शुद्ध आणि 24 तास सलग पाणी देण्याची ही योजना असून भुसावळात गेली अनेक वर्षे ही योजना का रखडली आहे? हेच कळत नाही. ‘पाणी उशाला अन कोरड घशाला‘ अशी स्थिती भुसावळ शहरवासीयांची झालेली आहे. उन्हाळ्यात तर भुसावळ वासियांची पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अत्यंत दयनीय अवस्था होते. एक तर आठ दिवसानंतर नळाला पाणी येते आणि ते पाणी सुद्धा अशुद्ध असते. ही ओरड वर्षोनवर्षे चालली आहे.

विद्यमान वस्त्रोद्योग मंत्री हे गेल्या 16 वर्षापासून भुसावळ शहराचे नेतृत्व करत आहेत. तसेच 16 वर्षापासून हे सत्ताधारी पक्षाचेच प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु गेल्या 16 वर्षात भुसावळकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. सध्या ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री आहेत. नुकतीच भुसावळ नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत स्वतःची पत्नी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाली. गायत्री भंगाळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. नगराध्यक्षपद राष्ट्रवादी पक्षाचे आणि पालिकेत बहुमत भाजपचे आहे. 50 पैकी 27 भाजपचे नगरसेवक निवडून आले. म्हणजे नगरसेवकांचे बहुमत भाजपचे तर नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे. त्यामुळे विचित्र अवस्था भुसावळ शहराची झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न घेऊन गायत्री भंगाळे भुसावळ नगराध्यक्षपदी निवडून आल्या. आता भुसावळ पालिकेचा कारभार कशा पद्धतीने हाताळला जाईल हे एक प्रकारचे कोडेच म्हणावे लागेल. प्रत्येक कामाच्या प्रस्तावाला बहुमत भाजप नगरसेवकांचा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगराध्यक्षांना तारेवरचीच कसरत करावी लागणार आहे.

भुसावळ पालिकेत नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासन सुरू झाले आणि पहिल्यांदाच भुसावळकरांच्या भुसावळच्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून वादाला तोंड फुटले, असेच म्हणावे लागेल. अमृत योजनेचे काम सुरू करताना पालिका प्रशासनाने सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर आणि पाहणीनंतरच कामाला सुरुवात झाली असणार यात शंका नाही. तापी नदीमध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी जॅकवेल कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पाणी शुद्ध करण्याचे केंद्र हायवेवर जळगाव रोडवर होणार आहे. पाणी वितरित करण्यासाठी रस्ते खोदून त्यात पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. जामनेर रोडवर हे सर्व पूर्ण नियोजन परवानगी असताना आणि तीन महिन्यापासून टाकीचे खोदकाम होत असताना ते अचानक बंद झाल्याने शहरवासीय संतापले आहेत. नवीन नगराध्यक्ष पाणी समस्येबाबत जागरूक असल्याने त्या पुन्हा वादाला जास्तीचे तोंड फुटले नाही. नगरपालिका प्रशासनातर्फे काही तांत्रिक कारणास्तव ते काम बंद पडले आहे. त्याबाबत नव्याने मंजुरी होऊन नव्याने काम सुरू करण्यात येईल, असा खुलासा केला असला तरी भुसावळवासियांचा त्यावर विश्वास बसत नाही. भुसावळवासिया पाण्याच्या बाबतीत संतापले आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.