मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कथित बॉडी बॅग घेतला प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा आता ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांचीही याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आधीपासूनच ठाकरे गटाच्या काही नेत्यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच, काहींवर कारवाई देखील करण्यात आली होती. अशातच आता खिचडी घोटाळ्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकरांची चौकशी केली जाणार आहे, गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या सतत चौकशा सुरु आहे. अशातच ठाकरेंचा आणखी एक मोहरा चैकशीच्या जाळ्यात अडकला आहे.
खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?
मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.